संगमनेर तालुक्यात तात्काळ वीजेचे रोहीत्र मिळण्यास सुरुवात!
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या निर्देशानुसार महावितरण लागले कामाला
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात पूर्वी नादुरुस्त झालेले वीजेचे रोहीत्र बदलण्यासाठी १५ ते २० दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आमदार झाल्यानंतर अमोल खताळ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना वेठीस न धरता वीजेचे रोहीत्र तात्काळ बसवून देण्याचे निर्देश दिले होते. तसेच शेतकऱ्यांनकडून एक रुपया ही न घेण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्यात वीजेचे रोहीत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यातील खांडगाव आणि संगमनेर खुर्द शिवारातील घनपाई ओढ्या लगत असललेले दत्तू आबा यांच्या शेतातील वीजेचे रोहीत्र नादुरुस्त झाले होते. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी भाजपचे सचिव महेश मांडेकर यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच निळवंडे करूले शिव रस्त्याजवळ देखील वीजेचे रोहीत्र खराब झाले होते. ते बदलावे यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी बाबा पॅटर्नचे प्रमुख शिवाजी आहेर व निळवंडेचे उप सरपंच भाऊसाहेब आहेर यांच्यामार्फत आमदार अमोल खताळ यांच्याकडे रोहीत्र दुरुस्त करून देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार आमदार खताळ यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संगमनेर खुर्द व खांडगाव शिवारात महावितरण उप अभियंता लोहे यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन मुकेश महाजन व प्रथमेश इलेक्ट्रिकल कंपनीचे कर्मचाऱ्यानी तात्काळ वीजेचे रोहीत्र बसवून दिले होते. त्यामुळे खांडगाव व निळवंडे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.
मागे वीजेचे रोहीत्र मिळण्यासाठी महावितरणकडे वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. तसेच रोहीत्र बसवण्यासाठी स्थानिकाना वर्गणी काढावी लागत असे. परंतु, अमोल खताळ हे आमदार झाल्यानंतर त्यांनी वीजेच्या रोहीत्रासाठी वर्गणी काढण्याची गरज नसल्याचे सांगून रोहीत्राची मागणी केल्यानंतर तातडीने रोहीत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार अवघ्या ३ ते ४ दिवसात रोहीत्र उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अशा भावना खांडगाव येथील शेतकरी अण्णासाहेब गुंजाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.