चंदनापुरी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत महानुभव सत्संग सोहळा सुरू
◻️ सत्संग सोहळ्यातून आध्यात्मिक ऊर्जा - लोकनेते बाळासाहेब थोरात
◻️ भव्य मिरवणुकीतून अभूतपूर्व स्वागत
संगमनेर LIVE | हजारो अनुयायांची उपस्थिती, शिस्तबद्ध वातावरण, पारंपारिक वाद्यांचा गजर, पुष्पवृष्टी, तसेच विद्यार्थ्यांच्या झांजरी पथकासमवेत झालेल्या मिरवणुकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या महानुभव पंथातील सत्संगात श्रद्धेय प. पू. मोठे बाबा यांची भव्य मिरवणूक संपन्न झाली असून या मिरवणुकीचे स्वागत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. हा सत्संग सोहळा अध्यात्मिक ऊर्जा देणारा असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
चंदनापुरी येथे महानुभव पंथीय भव्य सत्संग सोहळ्याला आज सर्वविद आचार्यप्रवर श्री मोठेबाबा अंकुळनेकर यांच्या उपस्थितीमध्ये या महिनाभराच्या सत्संग महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ जयश्रीताई थोरात, आर. बी. राहणे, ऋषी बाबा अंजनगावकर, अशोक लांडगे, आनंदा राहणे, श्याम दिवटे, विजय राहणे, हरीश लांडगे, डॉ. संदीप राहणे, डॉ. दत्ता कांगणे, नवनाथ आरगडे, संदीप लांडगे, रमेश गुंजाळ, सोमनाथ गोडसे, पोपट राहणे, राहुल वालझाडे, कैलास सरोदे, अनिल कढणे आदि सह सत्संग सोहळा आयोजन समितीचे विविध सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी मोठेबाबा म्हणाले की, सृष्टीवर भगवंताच्या इच्छेनुसार सर्व घडत असतं. सामान्य घरे होती आता सर्वत्र चांगल्या इमारती दिसू लागल्या आहेत. त्याकाळी माणसे संवेदनशील होती. मात्र, आता काळ बदलत गेला भौतिक संपन्नता आली. माणूस माणसापासून दूर जातो की काय अशी भीती आहे. पण काही असले तरी मानवतेचा धर्म मोठा असून माणूस हा संवेदनशील आहेच. अध्यात्म व समाजाचा विकास हा विचार घेऊन प्रत्येकाने काम केले तर हजारो वर्षांची मानवता धर्माची परंपरा असलेला हा धर्म असाच वाढत राहील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, हिंदू धर्माला आणि वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. संत महात्मे समाज सुधारक या सर्वांनी मानवता धर्माचे मोठे महत्त्व सांगितले आहे. माणसातच देव पाहिला पाहिजे. माणसाची सेवा हीच खरी सेवा असून अध्यात्म ही प्रत्येकाला जगण्याची मोठी ऊर्जा देत असते. चंदनापुरी व परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन भव्य दिव्य केलेल्या हा महानुभव पंथीय सत्संग ऐतिहासिक ठरणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महानुभव पंथातील विविध आचार्य संत महंत उपस्थित होते. चंदनापुरी सह परिसरातील भावीक भक्तांनी एकत्र येऊन एक महिने चालणारा या भव्य महोत्सवाची तयारी केली आहे. दररोज दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्संग महोत्सवाला तालुक्यातील सर्व नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजन समिती व चंदनापुरी ग्रामस्थांनी व महानुभाव पंथ सत्संग संघाने केले आहे.