आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय होणारचं! - मंत्री विखे पाटील
◻️ मात्र, कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याची पालकमंत्र्यांची ग्वाही
◻️ते म्हणतात मी खरचं पडलो का? तर, अमोल म्हणतो मी खरचं निवडूण आलोय का?
◻️ मंत्री विखे पाटील म्हणाले आजी - माजी आमदार काढतायत रोज स्वता:लाचं चिमटे
◻️ वास्तवाला सामोरे जा! बाळासाहेब थोरात यांना मंत्री विखे पाटील यांचा मित्रत्वाचा सल्ला
संगमनेर LIVE (आश्वी) | आम्ही माणसं जोडण्यासाठी आश्वी आणि परिसरात पाच पुल बांधून दाखविले आहेत. तोडण्याची भाषा आम्ही कधीही केली नाही, अप्पर तहसिल कार्यालय हे जनतेच्या सुविधेसाठी आहे. तुमच्या ‘यशोधनातून’ जनतेला मुक्तता हवी होती. विधानसभेला तालुक्यातील जनतेने परिवर्तन केले आहे.
जनतेला मिळालेले स्वातंत्र्य आता तुम्ही हिरावून घेवू नका असा खरमरीत टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला. ते (बाळासाहेब थोरात) स्वतःला म्हणतात मी खरचं पडलो का? तर, अमोल म्हणतो मी खरचं निवडूण आलोय का? यासाठी ते स्वतःलाचं रोज चिमटा काढत असल्याची फिरकी विखे पाटील यांनी यावेळी घेतली.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे प्रवरा मेडकील ट्रस्टच्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकी नंतर प्रथमच माजी मंत्री थोरातांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. निमित्त होते अप्पर तहसिल कार्यालयाचे. हे कार्यालय आश्वी आणि पंचक्रोशितील गावे तसेच अन्य शेजारील गावे यांच्या सुविधेसाठी तयार होणार होते परंतू काहींना पोटसुळ उठला, त्यांनी लगेच तालुका तोडण्याची भाषा सुरु केली, त्यांना स्वातंत्र्याची लढाई आठवली. अशी घणाघाती टिका त्यांनी केली.
आश्वीच्या लोकांना अप्पर तहसिल कार्यालय हवे आहे, या भागातील त्यांच्या समर्थकांनाही विचारा तुम्हाला कार्यालय हवे आहे की, नको? यापुर्वी सुध्दा पोलिस स्टेशनमध्ये समाविष्ठ असलेली गावे त्यांनी जाणीवपुर्वक काढून घेतली होती. उच्च न्यायालयात लढाई करुन, ही गावे पुन्हा आश्वीमध्ये समाविष्ठ केली.
याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, अप्पर तहसिल कार्यालयाच्या संदर्भात आता महसूल विभागाने हरकती मागविल्या आहेत. महसूल मंडळांची रचना झाल्यानंतर अप्पर तहसिल कार्यालयाची निर्मिती होईल. ज्या गावांना समाविष्ठ व्हायचे नसेल त्यांना उगळून हे कार्यालय होणारचं असे ठामपणे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूकीत तालुक्यातील जनतेने परिवर्तन घडविले आहे. तुमच्या ‘यशोधन’ मधूनच तालुक्यातील जनतेला मुक्तता हवी होती. जनतेने केलेल्या परिवर्तनातूनच अमोल खताळांसारखा एक सामान्य तरुण लोकांनी आमदार म्हणून निवडून दिला. आम्ही जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नाही.
अप्पर तहसिल कार्यालयाची चर्चा सुरु झाली तर यांना स्वातंत्र्याची लढाई आठवली. आता जरा शांत बसा, जनतेने तुमच्या बाबतीत निर्णय केला आहे. त्यांना त्यांचे काम करु द्या. तुमच्या कारकीर्दीत वाळु आणि क्रशर माफियांना वैभव प्राप्त झाले. महायुतीचे पाठबळ हे जनतेच्या पाठीशी कायम असल्याचा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. तर, वास्तवाला सामोरे जा! असा मित्रत्वाचा सल्ला देखील यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिला आहे.