मानवतेच्या भुमिकेतून प्रवरा मेडिकल ट्रस्टचे काम सुरू - मंत्री विखे पाटील
◻️ पिंप्री - लौकी अजमपुर आणि आश्वी बुद्रूक येथील प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन
◻️ महिला दिनानिमित्त महिलांचा केला सन्मान
संगमनेर LIVE | देशातील नागरीकांना योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षेचे कवच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. आयुष्यमान भारत योजने प्रमाणाचे राज्य सरकारनेही महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा आता पाच लाख रुपये केली असून, आरोग्य सुविधा बळकट होण्यासाठी नागरीकांच्याही पाठबळाची गरज आहे. प्रवरा मेडीकल ट्रस्टने सामाजिक बांधिलकीतून सुरु केलेले आरोग्य केंद्र हे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकासाला पाठबळच असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
अंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून प्रवरा मेडीकल ट्रस्टने पिंप्री - लौकी अजमपुर आणि आश्वी बुद्रूक येथे सुरु केलेल्या प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मानवतेच्या भुमिकेतून प्रवरा मेडिकल ट्रस्टचे काम सुरू असल्याचे गौरवोद्गार मंत्री विखे पाटील यांनी काढले.
याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. विष्णु मगरे, विश्वस्त सौ. सुवर्णा विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश जगदाळे, प्रा. डॉ. के. व्ही. सोमसुन्दरम, आण्णासाहेब भोसले, अँड. शाळीग्राम होडगर, शिवाजीराव जोंधळे, मच्छिंद्र थेटे, भगवानराव इलग, रामभाऊ भुसाळ, मुकूंदराव सदाफळ, विनायकराव बालोटे, अजय ब्राम्हणे, प्रा. कान्हू गिते, सतिष जोशी, भारत गिते, अंकुशराव कांगणे, निवृत्ती सांगळे यांच्यासह पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशातील नागरीकांचे आरोग्य जपण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजनांचे काम सुरु आहे. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना आणि राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाला सुरक्षा कवच दिले आहे. आज आजारांची जेवढी संख्या वाढत आहे. तेवढे नवे उपचार उपलब्ध करावे लागत आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करीत असून, या योजनांचा मोठा आधार सामान्य माणसाला मिळत आहे.
अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उपस्थित महिलांना शुभेच्छा देवून, मंत्री विखे पाटील म्हणाले की, महिलांच्या सबलिकरणासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने लखपती दिदि निर्माण करण्याच्या दृष्टीने सुरु केलेले प्रयत्न महिलांमध्ये परिवर्तन करीत असून, बचत गटांची चळवळ आता एका चौकटीत अडकवून न ठेवता उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टीने पुढची पाऊलं टाकावी लागतील.
अहिल्यादेवी होळकरांचे ३०० वे जयंती वर्ष लक्षात घेवून अहिल्यानगर येथे उभारण्यात येणारे त्यांचे स्मारक हे महिला सक्षमीकरणाचे मोठे केंद्र ठरणार असून, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले घाट आणि पाण्याच्या दृष्टीकोनातून केलेल्या कामाला पुढे घेवून जाण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असल्याचे सांगितले.
प्रवरा मेडीकल ट्रस्टची स्थापना पद्मश्रींनी समाजातील शेवटच्या घटकासाठीच केली होती. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी या सर्व कार्याचा वटवृक्ष केला. आरोग्य सुविधांचा मोठे जाळे आज निर्माण झाल्यामुळेच सामान्य माणसाला प्रवरा हॉस्पीटल मोठा आधार ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
या दोन्हीही आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्राथमिक उपचारांची सुविधा, मोबाईल व्हॅन, रुग्णवाहीकेची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. कुलगुरु डॉ. विष्णु मगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर प्रा. सोमसुंदरम यांनी आभार मानले.
दरम्यान महिला दिनाच्या निमित्ताने प्रातिनिधीक स्वरुपात महिलांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. आश्वी बु।। आणि पिंप्री - लौकी अजमपुर ग्रामस्थांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांना सन्मानित करण्यात आले.