उंबरी बाळापूर जिल्हापरिषद शाळेत वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
◻️ ७० विद्यार्थ्याना वही, पेन आणि खाऊचे वाटप ; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत इयत्ता ३ री मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रणिती विलास शेळके या विद्यार्थ्यीनीचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व ७० विद्यार्थ्याना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले. हा सुंदर उपक्रम मुलीच्या पालकांनी सुरू केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कु. प्रणिती शेळके ही विद्यार्थिनी इयत्ता ३ रीत शिक्षण घेत असून गुरुवार दि. ६ मार्च २०२५ रोजी तिचा वाढदिवस होता. त्यासाठी कोणताही अवांतर खर्च न करता त्या रक्कमेतून तिच्या बरोबर शिक्षण घेत असलेल्या सर्व ७० विद्यार्थ्याना मुलींच्या पालकांनी वही व पेन या शालेय साहित्याचे वाटप केले.
यानंतर दुपारच्या जेवणात विद्यार्थ्याना मिष्ठान्न दिले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यासमवेत केक कापून प्रणितीने वाढदिवस साजरा केला. असा सुंदर उपक्रम राबवून वाढदिवस साजरा झाल्यामुळे दिवसभर गावात याबाबत चर्चा सुरू होती.
यावेळी मुलीचे वडील विलास शेळके, मुख्याध्यापिका विजया भुसाळ, शिक्षिका वैशाली पाबळ, शिक्षक रामराव देशमुख, नानासाहेब देव्हारे यांच्यासह कैलास उंबरकर, अशोक भुसाळ, गोरख डोखे, अविनाश गायकवाड, प्रकाश गायकवाड, ठकाजी जऱ्हाड, शिक्षक बाळासाहेब भुसाळ, योगेश भुसाळ आदिसह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान यावेळी प्रणितीला वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यानी शुभेच्छा दिल्या.