संगमनेर येथे तातडीने आरटीओ कार्यालय सुरू करा - आमदार तांबे
◻️ उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे स्वतंत्र आरटीओ कार्यालयासाठी आमदार सत्यजित तांबेचा पाठपुरावा
◻️ तालुक्यातील वाहण धारक व चालकांना मिळणार मोठा दिलासा
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या विकास कामांमधून राज्यात अग्रेसर ठरला आहे. संगमनेर तालुक्यात राज्यात सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत. संगमनेरसह अकोले तालुक्यातील नागरिकांना वाहतूक कार्यालयाच्या सुविधांसाठी श्रीरामपूर येथे जावे लागते, यामुळे त्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागते.
या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरला स्वतंत्र आरटीओ कार्यालय व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता. याबाबत आता आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून तातडीने हे कार्यालय सुरू करावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
त्यासाठी संगमनेर येथे स्वतंत्र उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) स्थापनेसाठी ठोस पावले उचलली आहेत. संगमनेर हा महसूलदृष्ट्या मोठा तालुका असून, येथे वाहतूक कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सत्यजित तांबे यांनी विभागीय परिवहन अधिकारी, गृह व परिवहन विभाग तसेच महाराष्ट्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरवा केला त्यासोबत हा विषय प्राधान्याने उचलून धरला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रस्ताव आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
संगमनेरमध्ये नवीन आरटीओ कार्यालय सुरू झाल्यास वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन तपासणी यांसारख्या सर्व सेवा स्थानिक स्तरावर मिळू शकतील, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचेल. तसेच, परिवहन व्यवस्थापन अधिक सुकर होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
या संदर्भात सत्यजित तांबे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे आर्थिक दृष्ट्या संपन्न झाले आहे. घरोघरी वाहने आहेत त्यामुळे तालुक्यात वाहनांची संख्या मोठी आहे शिवाय तालुका विस्ताराने मोठा आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिकांना वाहतूक सुविधांसाठी श्रीरामपूरपर्यंत प्रवास करावा लागतो.
ही मोठी अडचण लक्षात घेऊन आम्ही ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी या कार्यालयाबाबत सरकारदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार २२ जुलै २०२४ रोजी कायमस्वरूपी शिबीर कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करावे. अशी मागणी केली असून या मागणीला परिवार मंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले.
संगमनेर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालयासाठी आ. सत्यजीत तांबेंनी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. आ. तांबे यांनी विभागीय परिवहन अधिकारी, गृह व परिवहन विभाग तसेच महाराष्ट्र सरकारच्या संबंधित अधिकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरवा सुरु ठेवला. मार्च २०२५ मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील याबाबत निवेदन दिले आहे. आ. तांबे यांच्या या निर्णायक पाठपुराव्यामुळे संगमनेर येथे स्वतंत्र आरटीओ लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.