बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात सात वर्षाची चिमुकली ठार!
◻️ राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारातील घटना ; नागरीकांमध्ये संताप
संगमनेर LIVE (राहाता) | राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील दिघी रस्त्यावर असलेल्या दत्त मंदिरा जवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सात वर्षीय शाळकरी मुलगी ठार झाली. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या परिसरात लवकरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा अशी मागणी धनगरवाडी येथील संतप्त नागरिकांनी केली आहे.
स्नेहल संतोष राशिनकर (वय - ७) असे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. धनगरवाडी येथे संतोष राशिनकर यांच्या वस्तीजवळ बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने संतोष राशिनकर यांची मुलगी स्नेहल हीला घरासमोरून उचलुन शंभर फूट फरफटत नेले. त्यानंतर परिसरात आरडाओरड झाल्याने मुलीला सोडून बिबट्या अंधारात जवळील शेतात
पळून गेला. हल्ल्यात जखमी झालेल्या स्नेहल हीस तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्नेहल हीस मृत घोषित केले.
याबाबतची माहिती धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता रात्री उशिरा वनविभागाचे अधिकारी सानप, साखरे व बर्डे यांनी संतोष राशिनकर यांच्या वस्तीवर येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.
मागील काही दिवसांपूर्वी धनगरवाडी परिसरातील चितळी गावात एका लहान बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाला या परिसरात अनेकदा पिंजरा लावण्याची मागणी करूनही या मागणीकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याने वनविभागा विरुद्ध शेतकरी व नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर पुन्हा एका वस्तीवर बिबट्या दबा धरून बसला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे घटना घडली नाही. वन खात्याने धनगरवाडी परिसरात तातडीने पिंजरे लावुन बिबट्यांना जेरबंद करावे. तसे न झाल्यास वनखात्या विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल. असा इशारा सरपंच गोपीनाथ खरात, उपसरपंच साहेबराव आदमाने, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल रकटे, माजी सरपंच राजू रकटे आदिंसह नागरिकांनी दिला आहे.