आश्वी येथील प्रकाशलाल मुथ्था यांच्यावर पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार!
◻️ आश्वीचं नव्हें तर, तालुक्यासह नगर जिल्ह्यातील बहुदा पहिलाचं प्रयोग?
◻️ लाकडाऐवजी शेणाच्या गोवऱ्या, गावरान तुप आणि कापूरचा वापर
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील ज्येष्ठ व्यक्तीमत्व आणि जैन श्रावक संघाचे सचिव प्रकाशलाल बाबुलाल मुथ्था (वय - ७८) यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले होते. यावेळी त्यांच्या अंत्यविधीची धावपळ सुरू असताना पर्यावरणपूरक अंत्यविधी करण्याची संकल्पना पुढे आली आणि त्यानुसार त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार पार पडले.
यावेळी लाकडाऐवजी अंत्यसंस्कारासाठी मांची येथील गो - शाळेत गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवर्या, शुद्ध गावरान तूप, निसर्गनिर्मित कापूर आणि चंदनाचा वापर केला गेला. पर्यावरणाचे रक्षण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उज्ज्वल गोरक्षण केंद्र गो - शाळेच्यावतीने समाजाला दिशा देणारा उपक्रम राबविण्यात आला. आश्वीचं नव्हें तर, संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात देखील असा पर्यावरणपूरक अंत्यविधी बहुदा प्रथमचं करण्यात येत असल्यामुळे उपस्थित शेकडो नागरीकांच्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय झाला आहे.
याप्रसंगी दै. लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, प्रवीण चोपडा, कपील पवार, भाऊराव कांगुणे, भाऊसाहेब जऱ्हाड, बाळकृष्ण होडगर, हरीभाऊ ताजणे, रितेश मालानी, हरी चांडक, नवीन मुनोत, संजय गांधी यांच्यासह पंचक्रोशीतून आलेले विविध क्षेत्रातील नामवंत ग्रामस्थ, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान दिवंगत प्रकाशलाल मुथ्था यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन बहीणी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष मुथ्था आणि दै. लोकमतचे जाहिरात व्यवस्थापक अश्विन मुथ्था यांचे ते वडील होते.
मानवी जीवनात झाडाचे अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, जगभरात बेसुमार जंगलतोड सुरू आहे. त्यामुळे आम्ही भविष्याच्या दृष्टीने अंत्यविधीसाठी लाकडाऐवजी गो - शाळेत गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवर्या, गावरान तुप आणि कापूर अल्पदरात उपलब्ध करुन देणार आहोत. यामुळे निसर्गाचा समतोल राखण्याबरोबरचं प्रदुषणाला देखील आळा बसणार आहे. तसेच यातून मिळणाऱ्या निधीचा वापर गायीसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी करणार आहोत. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांनी देखील या उपक्रमाचे अनुकरण करावे. असे आवाहन उज्ज्वल गोरक्षण केंद्राचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांनी संगमनेर लाईव्हशी बोलताना केले.