जनकल्याण यात्रेतून विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर

संगमनेर Live
0
जनकल्याण यात्रेतून विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा जागर

◻️ अपर जिल्हाधिकाऱ्यानी झेंडा दाखवत प्रचार वाहनास केले मार्गस्थ

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | शासनाच्या विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ‘जनकल्याण यात्रा २०२५' चे राज्यभर आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगर शहरात दाखल झालेल्या या जनकल्याण यात्रेचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी स्वागत करत या प्रचार यात्रेच्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून जिल्ह्यात प्रचार -‌ प्रसिद्धीसाठी मार्गस्थ केले. 

या यात्रेतील प्रचार रथाच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. जनकल्याण यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे नुकताच झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, अरुण उंडे, गौरी सावंत, तहसीलदार सचिन डोंगरे, शरद घोरपडे, संजय घावटे आदी उपस्थित होते.

विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. 

लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

जनकल्याण यात्रेकरता एलईडी व्हॅनद्वारे दाखवण्यात येणाऱ्या माहितीपटाची निर्मिती व दिग्दर्शन शंकर बारवे यांनी केली आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्यात येणार आहे.

माहितीपटाद्वारे संदेश देतांना मंत्री झिरवाळ म्हणाले, राज्य सरकार आणि केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार या सर्वांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबवत आहे. या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, यासाठी डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांचे विशेष सहाय्य थेट त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. 

या योजनेतून भ्रष्टाचार, दिरंगाई थांबली आहे. समाजातील गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून सदर योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !