साखर कारखान्याचे काम राज्यात आदर्शवत - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
साखर कारखान्याचे काम राज्यात आदर्शवत - बाळासाहेब थोरात

◻️ संगमनेर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

◻️ ऊस उत्पादनात एआय सह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

◻️ गाळप, भाव, वीजनिर्मिती या सर्वात कारखाना जिल्ह्यात अव्वल 



संगमनेर LIVE | संगमनेर तालुका व अमृत उद्योग समूह हे एक कुटुंब आहे. कारखान्यामुळे अनेक शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी , विविध दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो. रात्रंदिवस अनेक चाके फिरत असतात सामूहिक कष्टातून यश मिळत असते. आगामी काळामध्ये एकरी ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. एआय सह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार असून थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम हे महाराष्ट्रात आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, पांडुरंग घुले, सौ. शरयूताई देशमुख आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्यामध्ये अनेक चाके रात्रंदिवस फिरत असतात. मोठ्या कष्टातून हे काम चालते, ऊस तोडणी कामगार रात्री अपरात्री काम करतो, वाहतूक, कारखान्याचे यंत्र, हे सर्व अविरतपणे सुरू राहते. हे मोठे काम आहे. याला कायम ईश्वराचा आशीर्वाद मिळत असतो. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे तत्त्व जपताना कारखान्याने कायम ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, कामगार, व्यापारी, छोटे छोटे दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. सहकारामुळे संगमनेरची बाजारपेठ भरलेली आहे.

थोरात कारखान्याने नवीन तंत्रज्ञान अवगत करताना काळानुरूप बदल केले आहेत. ५५०० मे टन कारखाना सह ३० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.  मागील वर्षात पाच कोटी युनिट वीज वितरित केली असून  रिकव्हरी चांगली राखली आहे.

कार्यक्षेत्रामध्ये एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून आगामी काळामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. त्यातून ऊसा संबंधाने सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना मिळणार आहे. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक वाहने निर्माण झाली असून आगामी काळात ग्रीन हायड्रोजन वर चालणाऱ्या गाड्या येतील त्यामुळे काळाबरोबर राहावे लागणार आहे.

आपण कायम चांगले व प्रामाणिक काम केले. कुणापेक्षाही आपण सरस आहोत. सहकार चांगला आहे. आपली राजकारणाची पद्धत परंपरा चांगली आहे. ती टिकवायची आहे. हे सर्व मोडण्याचा प्रयत्न होणार आहे. पण, त्या ठिकाणी वेळीच प्रतिकार आपण केला पाहिजे.

डॉ. तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे तत्व घेऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेची तळमळ असलेले व्यवस्थापन येथे आहे . संगमनेरच्या सहकाराचा अत्यंत शुद्ध भाव असून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याची परंपरा ही कारखान्याने कायम जपली आहे. बेस्ट मॅनेजमेंट हे या सहकाराचे वैशिष्ट्य राहिले असल्याचे ते म्हणाले.

बाबा ओहोळ म्हणाले की मागील पाच वर्षात कारखान्याने  इथेनॉल व अल्कोहोल निर्मितीमध्ये विस्तारीकरण केले आहे, वीज निर्मिती चांगली होत आहे, कारखान्यावरील कर्ज फेडले आहे. नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. चांगला भाव देण्याचे काम कारखान्याने केले आहे. तालुक्याची ही चांगली वाटचाल सर्वांना जपायची असून सध्या तालुक्यामध्ये लाईट नाही. पाणी पळवले जात आहे याकडे नवीन लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याची टीका त्यांनी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर गणपतराव सांगळे यांनी आभार मानले.

सौ. कांचनताई थोरात यांचे अभिष्टचिंतन..

सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून अमृत उद्योग समूहातील व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन करण्यात आले. सौ. कांचनताई थोरात या अत्यंत नम्र व धार्मिक स्वभावाच्या आहेत. साहेब राज्यात जबाबदारी सांभाळत असताना कुटुंब व तालुक्यातील कार्यकर्त्यांची जबाबदारी कायम सौ कांचनताई थोरात यांनी सांभाळली असल्याचे गौरवद्गार सौ दुर्गाताई तांबे यांनी काढले.

कारखाना गळीतात जिल्ह्यात अव्वल

अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा सहकारी साखर कारखान्यात पहिला क्रमांक असून ८ लाख २५ हजार ९०० मेट्रिक टन ऊस गाळप झाले. शेतकऱ्यांचे पेमेंट वेळेत करण्य बाबतीतही कारखाना पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच ऊस दर, वीज उत्पादन आणि निर्यातीतही कारखान्याने जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !