मांचीहिल येथे कानिफनाथ महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
◻️ आश्वी बुद्रुक आणि उंबरी बाळापूर गावच्या महिलांकडून दैनंदिन हरिपाठ
◻️ भव्य रहाट पाळणे, खाऊ, मिठाई आणि कटलरीच्या दुकानांनी परीसर गजबजला
◻️ बुधवारी हभप संदिपान महाराज शिंदे यांचे कीर्तन तर, गुरुवारी नामवंत पैलवानांच्या उपस्थितीत कुस्त्याची मेजवानी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र मांचीहिल येथे चैतन्य श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवास मंगलमय वातावरणात दि. १३ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. बुधवार दि. १९ मार्च २०२५ रोजी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू ह. भ. प. संदिपान महाराज शिंदे यांचे अमृततुल्य कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
यात्रोत्सव काळात दररोज नाथांचा विधिवत अभिषेक आणि पूजा केली जाते. तसेच संध्याकाळी आश्वी बुद्रुक आणि उंबरी बाळापूर गावच्या महिला दैनंदिन हरिपाठ करत आहेत. यावर्षी यात्रेचे स्वरूप भव्य दिव्य करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त याठिकाणी लहानांपासून मोठ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी रहाट पाळणे, खाऊ आणि मिठाईचे दुकाने, कटलरी व स्टेशनरी दुकाने थाटण्यात आली आहे.
बुधवार दि. १९ मार्च रोजी सकाळी नाथांची विधिवत महापूजा त्यानंतर विविध गावांमधून येणाऱ्या काठ्यांची सवाद्य मिरवणूक, ह. भ. प. संदिपान महाराज शिंदे यांचे अमृततुल्य कीर्तन व महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
गुरुवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून भव्य मैदान निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे. यावेळी जिल्हा व तालुक्यातील नामवंत पैलवान हजेरी लावणार असल्याने पंचक्रोशीत नागरीकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान या यात्रोत्सवातील दैनंदिन कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक व नाथ भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र मांची हिल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शाळीग्राम होडगर व मांचीहिल संस्थांनचे अध्यक्ष विजय पिसे यांनी केले आहे.