सर्वानी आपला तालुका आणि सहकार जपा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
सर्वानी आपला तालुका आणि सहकार जपा - बाळासाहेब थोरात

◻️ सहकारमहर्षी कारखान्याच्या विस्तारित आसवनी व इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ

◻️ सभासदांना दिवाळीला ३० किलो मोफत साखर

◻️ आश्‍वी अप्पर तहसील कार्यालयबाबत केली टिका 

संगमनेर LIVE | मोठा संघर्ष करून प्रवरेचे हक्काचे ३० टक्के पाणी संगमनेर, अकोले तालुक्याला मिळवले. पुढे शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर तालुक्यात पाईपलाईनचे जाळे निर्माण करून पिके उभे केली. त्यातून सहकारी साखर कारखाना व आर्थिक समृद्धता निर्माण झाली. आपण निळवंडे धरण व कालव्यासाठी रात्रंदिवस काम केले. कोणतेही काम एका दिवसात होत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात. उभे केलेले हे रचनात्मक काम व सहकार प्रत्येकाला जपावा लागणार आहे. मनभेद करणारे येतील मात्र त्यांना वेळीच रोखून आपला तालुका व सहकार जपा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत आसवनी व इथेनॉल प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, बाजीराव खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, चेअरमन बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, शंकरराव खेमनर, आर. बी. रहाणे, लहानभाऊ गुंजाळ, इंद्रजीत थोरात, व्हा. चेअरमन संतोष हासे, लक्ष्मणराव कुटे, मधुकरराव नवले, सुरेश गडाख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सन २०२४-२५ या गळीत हंगामातील ८ लाख ७७७ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, थोरात सहकारी साखर कारखाना हा तालुक्याच्या हृदयाचे काम करत असून घरासारखा स्वच्छ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक सहकारातील नेत्यांनी कारखान्याचे कौतुक केले आहे. शेतकरी व सभासद कामगारांचे कायम हित जपले आहे. शेतकऱ्यांना या हंगामात ३ हजार रुपये प्रति टन ऍडव्हान्स पेमेंट अदा केले आहे.

यशवंतराव चव्हाण व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनातून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळरानावर कारखाना सुरू केला. ८०० मे टन ते ५५०० हजार मे टन ही कार्यक्षमता आपण निर्माण केली. संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका होता. प्रवारामाई वाहत होती. पाणी उचलण्याचा अधिकार नसल्याने पाणी चोर म्हटले जायचे. या हक्काच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला आणि त्यातून ३० टक्के पाणी मिळवले. या संघर्षात मधुकरराव पिचड यांची मोलाची साथ राहिली. त्यातून तालुक्यातील शेती फुलली सहकार उभा राहिला. यासाठी अनेक दिवस काम करावे लागले. संगमनेर तालुक्याचे वैभव उभे आहे.

दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता निळवंडे धरण व कालव्यासाठी आपण रात्रंदिवस पाठपुरावा केला. आज कालव्यांद्वारे पाणी आले आहे. यामागे कोणाचे तरी कष्ट आहे. अनेक अडचणीवर मात करून हे काम पूर्ण केले. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचा शेरा हटवला. या कामाकरता आपण रक्त आटवले आहे. आज पाणी आले हे सहज आले नाही. तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी आपण रात्रंदिवस काम केले.

संगमनेर तालुक्यात राज्यात सर्वाधिक सबस्टेशन व वीज कनेक्शन आहे. मात्र आज वीज बंद करून पाणी पुढे नेले जात आहे. अनेक संकटे येणार आहेत म्हणून पाण्यासह तालुका जपा. कारखाना ही तालुक्याची जीवनदायी आहे. आपापसातील मतभेद दूर करा. आपल्या कुटुंबाकरता तालुक्याकरता अंतकरण शुद्ध ठेवा. काही लोक आता मनभेद करतील, अफवा पसरवतील अशांना वेळीच रोका. मोठ्या कष्टातून उभा केलेला सहकार, व तालुका जपण्यासाठी प्रत्येकाने कटीबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. तांबे म्हणाले की, अत्यंत कठीण वाटचालीतून थोरात कारखाना उभा राहिला आहे. राज्यामध्ये मोजक्या प्रगतशील सहकार आणि कारखान्यांमध्ये या कारखान्याचा समावेश आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासारखे राजहंस रूपाचे नेतृत्व आपल्या सर्वांना मिळाले आहे. त्यामुळे येथील सहकार, विविध संस्था, कारखाना आदर्शवत ठरला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल देण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा सुरू केल्या आहेत.

योग्य वेळी योग्य निर्णय घेणारे आपले व्यवस्थापन असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत चांगल्या नेतृत्वामुळे येथे वैभव उभे राहिले असून हे जपण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. विद्यमान सरकारचे शेतकऱ्यांबाबत धोरण अत्यंत चुकीचे असून जर शेतीबाबत चांगले धोरण घेतले तर भारत देश जगाला अन्नधान्य पुरवू शकतो असेही ते म्हणाले.

बाबा ओहोळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने शेतकरी व ऊस उत्पादकांचे हित जोपासले असून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारी ही तालुक्याची कामधेनू असल्याचे ते म्हणाले.

यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीननाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, सौ. मंदाताई वाघ, श्रीमती मीराबाई वर्पे, रामदास वाघ, संभाजीराव वाकचौरे, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर व्हाईस चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस उत्पादक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभासदांना दिवाळीला ३० किलो मोफत साखर..

थोरात कारखान्याच्या सर्व सभासदांना दिवाळीनिमित्त दरवर्षी १५ किलो साखर मोफत दिली जाते. मात्र सभासदांच्या आग्रहानंतर यापुढे सर्व सभासदांना ३० किलो साखर मोफत मिळणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीर करताच सर्व उपस्थित शेतकरी व सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

अप्पर तहसील कार्यालय जनतेच्या गैरसोयीचे नको..

महसूल विभागाने तयार केलेल्या प्रस्तावित कार्यालयाचा असा कोणताही प्रस्ताव नाही असे अगोदर म्हणत होते. नंतर जनतेचे मत विचारात घेऊन महसूल मंडळात फेरबदल करू असे म्हणत होते. आता करणारच आहोत असे म्हणत आहेत. सत्ता त्यांची आहे. आश्‍वी बुद्रुक येथील कार्यालय हे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना मोठे गैरसोयीचे ठरणारे आहे. तालुक्यातील नागरिकांची हेळसांड होणार आहे. तालुका विस्ताराने मोठा आहे तळेगाव, घारगाव, साकुर येथेही अपर तहसील कार्यालय करा. जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मात्र चुकीच्या पद्धतीने निर्णय लादले जात असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !