महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे - सौ. खताळ
◻️ जागतिक महिला दिनी जवळे कडलग येथील आशा सेविकेसह तालुक्यातील १३ आशा सेविकांचा सन्मान
संगमनेर LIVE | महिलांचे सबलीकरण झाले आहे असे आपण नुसते कागदोपत्री म्हणून चालणार नाही. तर, त्यांचे खऱ्याअर्थाने सबलीकरण होऊन त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे मत सौ. नीलमताई खताळ यांनी जागतिक महिला दिनी आशा सेविकाशी संवाद साधताना व्यक्त केले.
संगमनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील आशा सेविकांचा सन्मान सौ. निलम अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यक्रम समन्वयक हनुमंत गदादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक राजेश तिटमे, गणेश तोटे, कृषी अधिकारी बोरुडे आदिंसह आशा सेविका उपस्थित होत्या.
सौ. खताळ पुढे म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी महिला चूल आणि मुल हेच पाहत होत्या. मात्र सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आजही महिला राजकारण उद्योग विज्ञान तंत्रज्ञान शेती कला आणि प्रशासकीय सेवासह विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. स्त्री पुरुष समानतेचा विचार नुसता करून भागणार नाही तर पुरुषाबरोबर स्त्रीलाही तेवढाच सन्मान देणे गरजेचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिला सबलीकरणासाठी दिलेले योगदान कोणालाही विसरता येणार नाही. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी बचत गटांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे आजही महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम बनत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी काम करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
संगमनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या आरोग्यविषयक योजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी आपल्या प्रस्ताविकातून दिली. अध्यक्षपदाची सूचना लेखापाल किरण सातपुते यांनी मांडली. आशा सेविका समन्वयक संदीप सानप यांनी अनुमोदन दिले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक शांताराम गडाख यांनी केले. आभार आरोग्य सहाय्यक बाळा साहेब फटांगरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील आरोग्य सेविका आणि आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आशा सेविकांचा महिला दिनी सन्मान..
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग प्राथमिक आरोग्य केंद्राच्यामार्फत गावा गावात आशा सेविका म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या राजापूर येथील मनीषा विठ्ठल सोनवणे यांना तालुकास्तरीय तर सुनंदा वाणी मिराबाई मधे, अश्विनी थोरात, वैशाली दळे, मनीषा वाडगे, अर्चना मिसाळ, आशा शिंदे, सुनंदा साबळे, सुजाता गुंजाळ, मंगल वाणी व नौसीन शेख या १३ आशा सेविकांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.