संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार
◻️ ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत आमदार अमोल खताळ यांची घोषणा
◻️ सहकारमंहर्षी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजवला
संगमनेर LIVE | संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना हा सभासद अन शेतकऱ्यांच्या मालकीचा होता. मात्र, काहीं जणानी हा कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याप्रमाणे कारभार सुरू केला. तो कारखाना पुन्हा शेतकरी व सभासदांचा मालकीचा करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी साखर कारखाना निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.
संगमनेर साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक सभासदांच्या बैठकीत आमदार खताळ बोलत होते. वसंतराव गुंजाळ, दादाभाऊ गुंजाळ, डॉ. अशोक इथापे, वैभव लांडगे, संतोष रोहोम, विठ्ठलराव घोरपडे, रमेश काळे, रोहिदास साबळे, अँड. संग्राम जोधळे, अँड. गोरक्ष कापकर, बापूसाहेब देशमुख यांच्यासह ऊस उत्पादक सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, हा साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा होता. परंतु, कारखान्यावर काहीं जण मालकी हक्क गाजवत आहेत. तो कारखाना पुन्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदाच्या ताब्यात द्यायचा आहे. त्यासाठी आता ही निवडणूक ऊस उत्पादक सभासदांनीच हातात घेतली आहे. त्यामुळे आपण सर्व जण ही निवडणूक पूर्णताकदीनिशी लढविणार आहोत. ही निवडणूक नुसती लढावयची नाही तर जिंकायची सुद्धा आहे. त्या दृष्टीने आपण सर्वजण मतदारा सभासद पर्यंत पोहोचण्याचे काम करावे असे आवाहन केले.
आमदार खताळ पुढे म्हणाले, साखर कारखाना निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे अजून काही इच्छुक असतील त्यांची नावे लवकरात लवकर द्यावी असे आवाहन करून यानिवडणुकीच्या काळात कारखाना यंत्रणा गैरवापर होणार नाही याकडे लक्ष ठेऊन निवडणूक पारदर्शी होईल अशा सूचना प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी वसंतराव गुंजाळ यांच्यासह अनेक ऊस उत्पादक सभासदांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान महाराष्ट्र सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार ३ ते ९ एप्रिल या कालावधीत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. वैध नामनिर्देशन पत्रांची यादी १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १५ ते २९ एप्रिल दरम्यान अर्ज माघारी घेता येतील. यानंतर २ मे रोजी निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे. तर, ११ मे रोजी मतदान होणार असून १२ मे रोजी निवडणुकीचा निकाल घोषित केला जाणार असल्यामुळे निवडणूकीचा बिगुल वाजला आहे.