५० लि. दुधाची गाय निर्मितीचा संघाचा उपक्रम दिशादर्शक - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
५० लि. दुधाची गाय निर्मितीचा संघाचा उपक्रम दिशादर्शक - बाळासाहेब थोरात

◻️ १ एप्रिल पासून दूधाला प्रति लिटर ३४ रुपये भाव देणार - रणजितसिंह देशमुख 

◻️ राजहंस दूध संघाकडून मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळा

संगमनेर LIVE | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना केली. १९८० नंतर आपण पुढाकार घेऊन तालुक्यात दूध व्यवसाय वाढविला. आज तालुक्यात ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आगामी काळामध्ये कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन होण्याकरता राजहंस दूध संघाच्या वतीने ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या क्षमतेच्या गाई निर्माण करण्याचा घेतलेला उपक्रम हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने मिशन ५० लिटर अंतर्गत कालवड संगोपन योजना कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते. लक्ष्मणराव कुटे, आर. बी. राहणे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. अब्दुल समद, उदय तिवारी, विलास वर्पे, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशहा वाळुंज, भास्करराव सिनारे, विक्रम थोरात, संजय पोकळे, बबन कुराडे, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉ. प्रमोद पावसे, डॉ. सुजित खिलारी, मोहनराव करंजकर, डॉ. संतोष गव्हाणे कारगिल फीडचे भंडारी, आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी ५० लिटर दूध निर्मिती क्षमतेच्या नवीन कालवडी व गाई यांचे प्रदर्शन संपन्न झाले. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सहकाराबरोबरच शेतीपूरक व्यवसाय वाढवण्यासाठी दूध संघाची स्थापना केली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, डॉ. अण्णासाहेब शिंदे, मनीभाई देसाई, आप्पासाहेब पवार यांच्यासह जुनी पिढीने दूध वाढीबाबत मेळावे घेऊन दिशा दाखविली. 

१९८० नंतर तालुक्यात दूध वाढीसाठी आपण पुढाकार घेऊन गावोगावी दूध वाढसाठी कार्यक्रम राबवले. गावोगावी दूध सोसायटी निर्माण केल्या. दूध संघाच्या वतीने कायम विविध उपक्रम राबवले आणि त्या माध्यमातून आज तालुक्यात सुमारे ९ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. मुरघास, एमडीफ गोठा या योजना यशस्वी ठरल्या. 

कमी गाईंमध्ये जास्त दूध निर्माण करणे गरजेचे आहे. याचबरोबर गुणवत्ता आणि शुद्ध दूध हे वैशिष्ट्य प्रत्येकाने जपले पाहिजे. इम्पोर्टेड व सॉर्टेड सिमेनचा वापर करून ५० लिटर दूध उत्पादन करणाऱ्या गाई निर्माण करण्याचा हा उपक्रम नक्कीच महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणार असल्याचे ते म्हणाले.

रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल सुरू आहे. एमडीएफ गोठा आणि मुरघास पद्धत आता राज्यात पोहोचली आहे. दुधाला यापुढे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. ५० लिटर दूध उत्पादन क्षमतेच्या गाई निर्माण करण्याकरता पहिल्या टप्प्यांमध्ये तालुक्यातील १२५० गाईंची नोंदणी करून त्यांना वेळोवेळी लसीकरण, रक्त तपासणी, शेण तपासणी या सर्व प्रक्रिया केल्या त्यावर सॉर्टेड सिमेन वापरून आता कालवडी उत्पादित झाले आहेत.

दुसऱ्या टप्प्यामध्ये या कालवडीचे संगोपन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना ड्राय मॅटर (कोरडा पौष्टिक आहार) देणे गरजेचे आहे. साधारण २० किलो मुरघास दोन किलो भुसा आणि पाच किलो खाद्य असे प्रमाण गरजेचे असून गव्हाच्या भुशामुळे गायीची पचन क्षमता वाढते. पण तो प्रमाणात असणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये गाईंची आहार, आरोग्य, आणि स्वच्छता जपली तर दूध व्यवसाय उद्योगात रूपांतर होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच भरभराट निर्माण करण्यात या व्यवसायाचा मोठा वाटा राहणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. अब्दुल समद, उदय तिवारी, डॉ. परीक्षित देशमुख, विक्रम भंडारी, विजय विश्वकर्मा यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. प्रमोद पावसे यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. ॲड. जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले तर विलास कवडे यांनी आभार मानले.

१ एप्रिल पासून ३४ रुपये प्रति लिटर भाव देणार..

दूध व्यवसायात सातत्याने चढउतार सुरू असतात. राजहंस दूध संघाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध उत्पादकांच्या जीवनामध्ये सातत्याने आनंद निर्माण केला आहे. सहकारामुळे खाजगी दूध संघांना भाव वाढ देणे बंधनकारक होत आहे. राजहंस दूध संघाने कायम इतरांपेक्षा चांगला भाव दिला असून १ एप्रिल २०२५ पासून प्रति लिटर ३४ रुपये भाव देण्यात येणार असल्याचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी जाहीर केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !