जिवंत सातबारा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - आ. खताळ
◻️ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरु केली जिवंत सातबारा मोहीम
◻️ प्रक्रिया मोफत असून दलाल किंवा अधिकाऱ्याला पैसे न देण्याचे केले आवाहन
संगमनेर LIVE | शेतीच्या मालकी हक्कात अडथळा ठरणाऱ्या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरून कमी करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, त्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिवंत सातबारा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे मयत खातेदारांची ७/१२ उताऱ्यावरील नावे कमी होऊन वारस नोंदी करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विविध कारणांमुळे अनेक वर्षे प्रलंबित असणारी वारस नोंदींची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावरती वारसांची अधिकृत नोंदणी होऊन खरेदी - विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. वारसांना शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल. वारसांमध्ये मालकी हक्कासंदर्भात असणारे कायदेशीर वाद टाळता येतील. शासन निर्णयानुसार १ ते ५ एप्रिल दरम्यान संबंधित गावांच्या तलाठ्यांनी मृत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन केले आहे. ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसांना आवश्यक कागदपत्रां सह अर्ज सादर करण्याची संधी आहे.
२१ एप्रिल ते १० मे दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. यासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती (नाव, क्य, पत्ता, मोबाईल क्रमांक), रहिवासी पुरावा सादर करण्याचे आवाहन आमदार खताळ यांनी केले आहे.
दरम्यान ही सर्व प्रक्रिया मोफत असून कोणत्याही दलालाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका, असे महसूल विभागाने जाहीर केले असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले