भगवान महावीर हे फक्त जैन धर्माचे नव्हे तर, ते प्रतिभा संपन्न विश्वगुरु होते
◻️ साध्वी आदर्शज्योतीजी महाराज यांचे अमृततुल्य मार्गदर्शन
◻️ आश्वी येथे भगवान महावीर यांची जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
संगमनेर LIVE (आश्वी) |भगवान महावीर हे फक्त जैन धर्माचे तीर्थकर नव्हे तर, प्रतिभासंपन्न विश्वगुरु होते. त्यांनी जगाला ‘जगा आणि जगु द्या!’ हा संदेश दिला. यामध्ये चार वेद, ३८ आगम, ८४ हजार ग्रथांचा सार आहे. म्हणुनच सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितेल होते की, “ज्या दिवशी महावीराचा सिध्दांत सोडला जाईल, त्या दिवशी जगाचा पतनाची सुरुवात होईल.” आज जगाने अहिंसा सोडुन हिंसेचा अन् सत्य सोडुन असत्याचा स्वीकार केल्याने जगात अशांतता निर्माण होत असल्याचे जैन साध्वी आदर्शज्योतीजी महाराज यांनी सांगितले. अशी माहिती जेष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी कळवली आहे.
‘अहिंसा हमारा नारा है मानव धर्म प्यारा है’ ‘जीवो और जीने दो’ ‘सबको सुख पाने दो’ चा संदेश देत जैन धर्माचे २४ वे तिर्थकर भगवान महावीर स्वामीचा जन्म कल्याण महोत्सव व डॉ. आत्मज्योतिजी म. सा. यांचा ३२ वा दीक्षा दिवस आश्वी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
जैन धर्माचे २४ वे तिर्थकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त येथील जैन स्थानकात साध्वी दक्षिणज्योती डॉ. आदर्शज्योतिजी म. सा., मधुरवक्ता डॉ. आत्मज्योतिजी म. सा., संगितप्रेमी डॉ. रजतज्योतिजी म. सा. यांच्या आशीर्वादाने गुरुवारी सकाळी अँड. अशोक बोरा, दिपक बोरा, किरण बोरा परिवाकडून जैन ध्वजाचे अनावरा व त्यानंतर भव्य अशी अहिंसा मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी अग्रभागी मंगल कलश घेतलेल्या मुली, महिला, मध्यभागी भगवान महावीरांची प्रतिमा असलेला अहिंसा रथ, मागे पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले पुरुष ‘जिओ और जीने दो’ ‘सबको सुख पाने दो’ ‘अहिंसा हमारा नारा है मानव धर्म प्यारा है’ चा संदेश देत गावातील मुख्य मार्ग, आनंद चौक व पुन्हा जैन स्थानकात पोहोचले.
या ठिकाणी आनंद दरबारात आनंद जैन शाळेच्या मुलांनी धार्मिक सांस्कृतिक महावीर जन्मावर अधारीत नाटीका सादर केल्या. अॅड. अशोकलाल बोरा यांच्या देणगीतून साकारलेल्या जैन धर्म स्थानकातील लिफ्टचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आश्वी जैन श्रावक संघाचे वतीने दक्षिणज्योती आदर्शज्योतीजी महाराज यांना वात्सल्य सिंधु उपाधीने सन्मानित करण्यात आले.
डॉ. आत्मज्योतिजी म. सा. यांचा ३२ वा दीक्षा दिवस साजरा करण्यात आला. यानंतर जैन साध्वींचा सुमधुर व अमृततुल्य प्रवचनाचा लाभ उपस्थित भाविकांना घेतला. यानंतर स्व. शांताबाई मुळचंदजी बोरा परिवाकडून गौतमप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
तर, भगवान महावीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त सायंकाळी ६ वा. सुभाषलाल गांधी, सुमतीलाल गांधी, संतोष भंडारी, निलेश चोपडा, अमित भंडारी, नितिन गांधी, अमित गांधी, अश्विन मुथ्था यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघ आणि नवकार ग्रुप युवक मंडळाने परिश्रम घेतले. याप्रसंगी इतर समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती देखील जेष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी कळवली आहे.