महात्मा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
महात्मा फुले यांचा मानवतावादी विचार देशाला पुढे नेणारा - बाळासाहेब थोरात

◻️ फुले दांपत्याचे भव्य स्मारक उभारणार - आमदार सत्यजीत तांबे

◻️ संगमनेर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

संगमनेर LIVE | क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव, बंधुता, समता जोपासणारा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

माळीवाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींसह पदाधिकारी व युवक कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला. बहुजनांच्या विकासाचा विचार करून आयुष्यभर काम केले. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. समाजाच्या कल्याणासाठी मानवतावादाचा विचार दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय लोकशाही व राज्यघटनेमध्ये सर्व समाज सुधारक, संत यांचे विचार आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर भारतीय राज्यघटना आहे. देश अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी या राज्यघटनेतील या मूलभूत विचारांची देशाला गरज आहे. जातीभेद मिटवणे, वाद कमी करणे हे अत्यंत गरजेचे असून महात्मा फुले यांचा मानवतावादाचा विचारच देशाला पुढे नेऊ शकतो असे ते म्हणाले.

डॉ. तांबे म्हणाले की, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतेचा पुरोगामी विचार देशाला दिला. अंधश्रद्धा निर्मूलन,सतीची चालबंदी, केशवपण बंदी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सामाजिक विषमता नष्ट करून समाजात समता निर्माण करण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, संगमनेर मध्ये सर्व समाज एकत्र येऊन विविध महापुरुषांच्या जयंती साजरी करत असतात. महात्मा फुले यांचे कार्य समाजाला सदैव प्रेरणादायी असून त्यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवले. तत्कालीन समाजाचा रोष पत्करून त्यांनी महिला शिक्षणाचा नवा अध्याय लिहिला. आणि त्यामुळे आज महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत.

दरम्यान यानंतर यशोधन संपर्क कार्यालय येथे ही क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. 

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक होणार - आमदार सत्यजीत तांबे

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या जीवनात अमलाग्र बदल घडविले. स्वतःच्या पत्नीला पहिली शिक्षिका केले. तत्कालीन समाजाविरुद्ध बंड पुकारले. शेण व दगडांचा मारा सोसला. शिक्षणात क्रांती घडवून आणली. हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणण्याचे काम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले असून त्यांच्या विचारांचा वारसा सदैव जोपासला जाणार आहे. 

संगमनेरमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांच्या कार्यकाळात माळीवाडा येथे पुतळा उभारण्यात आला. मात्र आता लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ. तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !