रुग्णांनी डायलेसिस व सोनोग्राफीचा लाभ घ्यावा - आमदार अमोल खताळ
◻️ ग्रामीण रुग्णालयातील डायलेसिस व सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण
संगमनेर LIVE | ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा रुग्णांनी महागड्या रुग्णालयामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये डायलेसिस किंवा सोनोग्राफीसाठी न जाता घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात सुरू झालेल्या डायलेसिस आणि सोनोग्राफीचा लाभ घ्यावा. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध झालेल्या डायलिसिस आणि गरोदर महिला सोनाग्रफी युनिटचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधिकारी संदीप कचेरीया, डॉ. जयश्री घोडके, डॉ. अरुण आहेर, गणेश बोऱ्हाडे, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, सौरभ देशमुख, शहराध्यक्ष कैलास कासार, सिताराम पानसरे, शरद पानसरे, विनायक वाडेकर, निवृत्ती पानसरे यांच्यासह रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी व घुलेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की संगमनेर व परिसरात मोठ्या प्रमाणात किडनीग्रस्त रुग्ण आहे. त्या रुग्णांना डायलेसिस अत्यंत महागड्या हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. त्यासाठी आपण आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस आणि गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी मशीन सुरू झाले आहे. त्याचा आर्थिक परिस्थिती नसलेल्या गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आ. खताळ यांनी केले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ चव्हाण म्हणाले की, रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाशी सौजन्याने बोला. त्यामुळे त्या रुग्णाचा निम्मा आजार बरा होतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णाशी सौजन्याने बोला असा सल्ला दिला. येथून मागील काळामध्ये डायलयासिस करण्यासाठी पुणे मुंबई नाशिक यासारख्या मोठ्या शहरामध्ये रुग्णांना जावे लागत होते.
मात्र गरोदर महिलांसाठी या ग्रामीण रुग्णालयामध्य आठवड्यातील चार दिवस सोनोग्राफीची सोय करण्यात आली आहे. या योजनेचा संगमनेर गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांनी केले. यावेळी वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल आमदार खताळ यांच्या हस्ते डायलेसिस विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन भगवान आहेरे यांनी केले. तर, उपस्थित आमचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया यांनी मानले.
कोविडच्या काळात संगमनेर व्यवस्था परिवर्तनच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ व समूहातील इतर सदस्यांनी ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीनचा पाईप भेट देण्यात आला होता. त्या माध्यमातून अनेक विविध रुग्णांना जीवदान मिळाले आहे. याचा घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया यांनी आवर्जून उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.