संगमनेर येथे महिलांनी ओढला ऐतिहासिक हनुमान रथ!
◻️ आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते रथाचे पूजन
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील शेकडो महिलांनी “बजरंग बली की जय” “पवन पुत्र हनुमान की जय” असा जयघोष करत हनुमानाचा रथ ओढला. या हनुमान रथाचे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते पूजन करून शहराच्या विविध भागातून या रथाची मिरवणूक काढण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हनुमान जयंती निमित्त चंद्रशेखर चौकातील मोठा मारुती मंदिर या ठिकाणी असणारा हनुमानाचा रथ सजविण्यात आला होता. सर्वप्रथम संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून वाजत गाजत भगवा ध्वज आणला आणि मानाच्या हनुमान रथाला लावला. हनुमान रथ ओढण्यासाठी एका मागे एक शेकडो महिला जमा झाल्या.
यावेळी आमदार अमोल खताळ आणि निलम खताळ त्यांनीही सहभागी होत रथ ओढला. चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिर आणि मोठामारुती येथून महिलांनी हा रथ ओढत रंगारगल्ली, लक्ष्मीचौक, साळीवाडा, लाल बहादूर शास्त्री चौक, माळीवाडा, चावडी, बाजरपेठ नेहरूचौक मार्गे पुन्हा चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरामध्ये या रथाच्या मिरवणुकीचा समारोप झाला.
दरम्यान यारथ यात्रेमध्ये संगमनेर शहरातील शेकडोच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. हनुमान जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
ऐतिहासिक रथाचा इतिहास..
ब्रिटीश काळात या रथयात्रेवर बंदी घालण्यात आली होती. त्याचवेळी स्व. झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे या धाडसी, महिलांनी ब्रिटिश सरकारचा आदेश झुगारून लावत या हनुमान रथा वर चढून पवनपुत्र हनुमान यांची प्रतिमा कुणालाही काही कळण्याच्या आतच रथाचा दोर ओढण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत हनुमान जयंतीला हा हनुमान रथ ओढण्याचा मान महिलांना मिळत आहे.