संगमनेर येथे सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार - आमदार अमोल खताळ
◻️ क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार खताळ यांचे अभिवादन
संगमनेर LIVE | संगमनेर शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांचा पुतळा उभा करणार अशी घोषणा आपण केली होती. त्यानुसार त्या पुतळ्या संदर्भातील सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच संगमनेर शहरात पुतळा उभारला जाईल अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आमदार खताळ बोलताना म्हणाले की, पूर्वीच्या काळी वंचित पीडित उपेक्षित समाजाला कमी लेखले जात होते. त्या समाजाला महात्मा फुले यांनी मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
तसेच सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु करत शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रामध्ये महिला आघाडी वर आहे. त्याचे खरे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना असल्याचे त्यांनी म्हंटले.
दरम्यान यावेळी महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचे तरुण व महिला उपस्थित होते.