हिंदु तरुणावरील गुन्हे मागे घेऊन शहरातील अवैध धंदे बंद करा!

संगमनेर Live
0
हिंदु तरुणावरील गुन्हे मागे घेऊन शहरातील अवैध धंदे बंद करा!

◻️ मागणी मान्य न झाल्यास शनिवारी मोर्चा काढण्याचा दिला इशारा 

◻️ ‘एक हे तो सेफ हे’ म्हणायचे आणि निवडणूकीनतंर खोट्या गुन्ह्यात हिंदुना अडकवायचे हा कुठले हिंदुत्व ? 

संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील हनुमान जयंती उत्सव मिरवणूक दरम्यान हिंदुत्वादी युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी तथा संगमनेर शहरातील अवैध धंदे मटका व्यवसाय बंद करण्यासाठी व ललित परदेशी यांची फिर्याद घेण्यासाठी संगमनेर नागरिकांच्या युवकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास २२ एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संगमनेर शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी दिली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील अवैध धंदे, मटका, जुगार क्लब, गुटखा, अवैध देशी विदेशी दारू बंद करावेत. तसेच राजकीय सूडबुद्धीने प्रेरित झालेल्यांच्या दबावात येऊन दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. त्याचबरोबर ललित परदेशी यांची तक्रार घेऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

यात पुढे म्हटले आहे की, संगमनेर  शहरांमध्ये सध्या अवैध व्यवसायाचा सुळसुळाट सुरू झालेला आहे. अवैधरित्या गुटखा विक्री, मटका, लोटो गेम, पत्याचे क्लब, देशी - विदेशी दारू विक्री, अवैधरित्या वाळू वाहतूक, खुल्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे. यामुळे संगमनेरची शांतता व सुव्यवस्था भंग होत आहे. संगमनेर मध्ये हिंदू-मुस्लीम तणाव देखील वाढत आहे आणि आता तर ह्या अवैध व्यवसायातून संगमनेर मधील हिंदू - हिंदू युवकांमध्येच वाद निर्माण झालेले आहेत.

संगमनेर शहर व तालुक्याची संस्कृती व इतिहास लक्षात घेता प्रत्येक सण उत्सव परंपरा मोठ्या उत्साहात एकोप्याने करण्याचा समृद्ध वारसा संगमनेरकरांनी जपला. सुप्रसिद्ध असलेला सार्वजनिक गणेशोत्सवा सोबतच शिवजयंती, श्रीराम नवमी, हनुमान जन्मोत्सव, डॉ. आंबेडकर व महात्मा फुले जयंती अश्या विविध उत्सवांनी संगमनेरचे वातावरण भारून जाते. 

विविध मंडळे व समित्यांचे कार्यकर्ते हे भाविक भक्तांच्या आणि व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक यांच्या सहकार्यातून हे मोठे उत्सव गुण्या-गोविंदाने पार पाडतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरमधील वातावरण हे जाणूनबुजून दुषित करुन इथे राजकीय दहशतीचे वातावरण करून एकाधिकारशाही निर्माण करण्याचे स्वप्न काही झारीतील शुक्राचार्य पाहत आहेत. त्यासाठी प्रत्येक उत्सवात खोडा घालण्याचा प्रयत्न काही विकृतांनी चालवला आहे. 

गाव मारुती व गाव उत्सव नावाने संगमनेर शहर व तालुक्यातून हनुमान जयंती निमित्त वर्गणी काढायची व स्वतःचा वैयक्तिक उत्सव असल्याचा कांगावा करायचा हे कितपत योग्य आहे. तसेच वाद करणाऱ्यामध्ये दहशत करणाऱ्यामध्ये शंभर टक्के संगमनेर मधील अवैध व्यवसायिकांचा सहभाग असतो. अवैध व्यावसायिक टोळी निर्माण करून संगमनेर मध्ये सतत दहशत निर्माण करतात. 

त्यामुळे हे अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावेत. शिवजयंती उत्सवादरम्यान बस स्थानक परिसरातील वाद असो, श्रीराम नवमी दरम्यान उपनगरातील मंडळांना दिलेला त्रास असो, किंवा हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक रथ उत्सवात मुद्दामहून घडवून आणलेले वादाचे प्रकरण असो. एकीकडे निवडणुकीपुरता हिंदूंना एक हे तो सेफ हे चे नारे देऊन मत लाटायचे व निवडून आल्यावर हिंदू युवकांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवायचे हा कुठला हिंदुत्ववाद? 

हनुमान जयंती उत्सव हा गावोत्सव आहे. कारण या उत्सवासाठी अख्या गावातून वर्गणी काढली जाते हा कोणत्याही खाजगी व्यक्तीचा उत्सव नाही. तसेच विजय रथा दरम्यान संगमनेर गावठाणातील चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, वाडेकर गल्ली, खंडोबा गल्ली, माधव थिएटर परिसरातील पहिले ढोल पथक असलेल्या हिंदुराजा ढोल पथकाने गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुरु असलेल्या विजय रथाला वाद्यांची सलामी द्यायची परंपरा सुरू ठेवण्यासाठी वादनासाठी ढोल पथकातील वादकांना गावठाणातीलच काही तरुणांनी केवळ राजकीय मतभेद असल्याने विरोध केला व त्याचा विपर्यास सामान्य भांडणात झाले. 

याप्रसंगी उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या समोरच उपरोक्त प्रकरण घडले व काही जबाबदार नागरिकांनी ते जागेवर मिटवले देखील परंतु सर्व प्रकरण मिटवल्या नंतर काहींची विकृती जागी झाली व ढोल पथकातील वादकांसह उपस्थित हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि वाद मिटवण्याचे प्रयत्न करणाऱ्या सुज्ञ नागरिकांवरच मारहाणी केल्याचा, सोन्याची साखळी गहाळ झाल्याचा व शस्त्र बाळगण्याच्या अतिरंजितपणे रंगवलेल्या तक्रारीवरून खोटे गुन्हे लादण्यात आले. 

सदर प्रकरणात पोलीस कर्मचारी स्वतः उपस्थित होते तरीही असे खोटे गुन्हे दाखल कसे झाले? कोणाच्या राजकीय दबावापोटी हे गुन्हे दाखल करण्यात आले? केवळ स्वतःचे वैयक्तिक वाद हे संपूर्ण चौकाच्या आणि गावाच्या उत्सवात आड आणून वैयक्तिक आकसापोटी राजकीय ताकदीचा गैरवापर करून हे खोटे गुन्हे काहींनी मुद्दाम लादले आहेत. 

अश्या प्रवृत्तीच्या विरोधात हिंदुत्ववादी व शिवप्रेमी युवक आता शांत बसणार नसून हे गुन्हे तत्काळ मागे न घेतल्यास शनिवार २२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मोठ्या प्रमाणात सर्व युवकांना घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील. तसेच ललित परदेशी यांना हनुमान जयंती उत्सव निमित्त झालेली मारहाण शिवीगाळ गंभीर स्वरूपाची असल्याने त्याने दिलेल्या तक्रारीवरून फिर्याद दाखल करून घेण्यात यावी, ही विनंती करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते युवक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !