कायदा सुव्यवस्था व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस चौकीचा उपयोग होणार
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दिल्लीनाका पोलीस चौकीचे उद्घाटन
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील दिल्लीनाका भागात सतत होणारी वाहतुकीची होणारे कोंडी दूर होण्यासाठी तसेच या भागात घडत असणाऱ्या विविध घटनांवरती पोलीस प्रशासनाचा नेहमी वचक राहण्यासाठी या पोलीस चौकीचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून दिल्ली नाका परिसरात सुरू करण्यात आलेली पोलीस चौकी (पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन) आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, तालुकाप्रमुख रमेश काळे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, रौफ शेख, शशांक नामन, सागर भोईर तसेच संगमनेर उपविभाग आणि शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, या पोलीस चौकीसाठी स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागात घडणाऱ्या विविध घटनावर नियंत्रण येण्यासाठी या पोलीस चौकीची मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे म्हणाले की, संगमनेर शहरातील संवेदनशील भाग म्हणून दिल्ली नाका भाग ओळखला जात आहे. या भागात वाहतूक कोंडी कायमच होत असते ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचारी निश्चितच प्रयत्नशील राहतील असे आश्वासन पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिले.