उद्या महाराष्ट्र दिनी १० हजार नागरीक घेणार समतेच्या मिसळीचा आस्वाद!
◻️ संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्यावतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी
◻️ सायंकाळी शिवराय ते भीमराव या महापुरुषांच्या गीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट
संगमनेर LIVE | हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार घेऊन संगमनेर मध्ये १८५७ पासून सामाजिक सलोख्याचे व बंधुभावाचे वातावरण वाढीस हाच विचार अधिक बळकट करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन उद्या महाराष्ट्र दिनानिमित्त समतेची मिसळ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील सुमारे १० हजार नागरिक यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार म्हणून ओळखला जातो. १८५७ पासून संगमनेर मध्ये एकत्रितपणे येऊन विविध उपक्रम साजरे करण्याची परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अनेक वेळा सर्व संगमनेरकरांनी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला आहे.
युवक नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन समतेची मिसळ हा कार्यक्रम नियोजित केला आहे. यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू विविध समाजांनी स्वीकारले असून त्या सर्व एकत्रित करून सुमारे १० हजार संगमनेरकरांना मिसळीचा आस्वाद दिला जाणार आहे.
उद्या गुरुवार दिनांक १ मे २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत नवीन नगर रोड येथे समतेची मिसळ हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी शहरातील सर्व समाजातील लोक एकत्र झाले असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करत आहे.
तरी शहरातील सर्व नागरिक, महिला, युवक, जेष्ठ, बालक, विद्यार्थी या सर्वांनी या समतेच्या मिसळ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सामाजिक सलोखा व सर्वधर्मसमभाव ही महाराष्ट्राची परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात, व विविध सामाजिक संघटना आणि सर्व समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
गोपाळकाला ही आपली धार्मिक परंपरा..
गोपाळकाला मध्ये सर्व नागरिक, महिला आपल्या घरचा शिधा, भाजी, भाकरी घेऊन एकत्र येतात आणि तो प्रसाद म्हणून सेवन करतात. हीच सामाजिक समतेची सलोख्याची व बंधुभावाची ही परंपरा अधिक घट्ट होण्यासाठी समतेची मिसळ हा सर्वांनी आयोजित केलेला उपक्रम कौतुकास्पद व महाराष्ट्राला दिशादर्शक असल्याचे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
डॉ. अनिरुद्ध वनगर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट
महाराष्ट्र दिनानिमित्त यशोधन मैदानावर सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणारा शिवराय ते भीमराव या गीतांचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ही तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.