नागरिकांना अधिसूचित सेवा कालमर्यादेत द्या - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
◻️ महाराष्ट्र लोकसेवा हक्क आणि राज्यस्तरावर प्रलंबित विषयांबाबत आढावा बैठक संपन्न
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | विविध शासकीय विभागांनी प्रलंबित कामांना गती देण्यासोबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत १०० टक्के सेवा विहित कालमर्यादेत द्याव्यात. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ आणि राज्यस्तरावर प्रलंबित विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा उप वन संरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार शरद घोरपडे आणि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. आशिया म्हणाले, अधिनियमानुसार चांगली कार्यवाही करणाऱ्या कार्यालयांना सन्मानित करण्यासोबत ९० टक्क्यापेक्षा कमी सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. ऑफलाईन सेवा देणाऱ्या कार्यालयाकडूनही विहित नमुन्यात माहिती घेण्यात यावी. आपले सरकार केंद्राची दर्जा तपासणी करावी. ग्रामपंचायतीत तक्रार पेटी ठेवण्यात यावी. गुरुवारी संसद अथवा विधिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी आपले सरकार सेवा केंद्र, अर्जदारांना मोफत अपील सुविधेची माहिती देणे, आरोग्य केंद्रातील सुविधा, संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समिती योजना, पाणी पुरवठा योजना, अतिक्रमण काढणे, शासकीय जमिनीचा उपयोग, बुऱ्हाणनगर येथील कचरा डेपोसाठी जागा, उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.