डॉ. आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे ८ ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजन

संगमनेर Live
0
डॉ. आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे ८ ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजन

◻️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम 

◻️ शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आदि ठिकाणी होणार महामानवाच्या विचारांचा जागर 

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह' निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाचे ८ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात येणार असून १४ एप्रिलपर्यंत भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे नियमित वाचन करणे व जनजागृती करणे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 

या सप्ताहात ९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय वसतिगृहे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवर आधारीत वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन तसेच योजनाच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करणे आदी उपक्रम राबविण्यात येतील.

समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात १० एप्रिल रोजी पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे विविध योजनाबाबत जनतेचे प्रबोधन करण्यासोबतच मार्जिन मनी योजनेतंर्गत कार्यशाळा राबविण्यात येणार आहे. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात येईल आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात येईल. 

१२ एप्रिल रोजी भारतीय संविधानाविषयी माहिती देणारा संविधान जागर कार्यक्रम व महिला मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. 

 जेष्ठ नागरिकांसाठी १३ एप्रिल रोजी जनजागृती शिबीर व नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह येथे रक्तदान शिबीर तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

सामाजिक समता सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त शासकीय कार्यालये, महाविद्यालय, आश्रम शाळा, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करणे, व्याख्याने, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. या दिवशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने जात वैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वितरण केले जाणार आहे, अशी माहिती   समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार यांनी दिली आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !