उंबरी बाळापूर जिल्हापरिषद शाळेचा गावाला अभिमान!
◻️ इयत्ता ४ थी च्या निरोप समारंभप्रसंगी विद्यार्थ्यासह शिक्षक ही झाले भावूक
संगमनेर LIVE (आश्वी) | शिक्षण, शिस्त, संस्कार आणि विविध शैक्षणिक उपक्रमासाठी पंचक्रोशीत नावलौकिक असलेल्या संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील जिल्हापरिषद शाळेतील इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्याचा ‘निरोप समारंभ कार्यक्रम’ नुकताचं पार पडला. यावेळी विद्यार्थ्यासह शिक्षक ही भावूक झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
याप्रसंगी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक रंगनाथ उंबरकर, शेतकी संघाचे संचालक भाऊसाहेब खेमनर, माजी संचालक भागवत उंबरकर, जेष्ठ व्यक्तीमत्व अनाजी भुसाळ, लोकनियुक्त सरपंच सौ. अर्चना भुसाळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत भुसाळ, तरुण सामाजिक कार्यकर्ते विवेक डोखे, योगेश डोखे, उद्योजक सागर दिघे, संतोष बिडवे, मुख्याध्यापिका विजया भुसाळ, शिक्षक रामराव देशमुख, नानासाहेब देव्हारे, शिक्षिका वैशाली पाबळ यांच्यासह इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्याना निरोप देण्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्यामुळे रंगनाथ भाऊराया उंबरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सरपंच सौ. अर्चना भुसाळ, विवेक डोखे, सागर दिघे आणि वर्गशिक्षक रामराव देशमुख यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी उंबरी बाळापूर जिल्हापरिषद शाळेचा गावाला अभिमान असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी बोलुन दाखवली.
दरम्यान इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्याना यावेळी फेटे बांधण्यात आले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्याना पेन व गुलाबपुष्प देऊन गौरवताना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चिमुकल्यांनी गोड - धोंड जेवणाचा अस्वाद घेतला. यानंतर निरोप घेण्याच्या भावनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षक भावूक झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.