कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू
◻️ नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा - आमदार अमोल खताळ
◻️ अवकाळी पावसाने संगमनेर तालुक्यातील पठार भागाला झोडपले
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ, निमिज, धांदरफळ, नांदुरी दुमाला पेमगिरी, कवठे धांदरफळ आदि गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसाने शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या मालकीच्या दोन गायीवर वीज पडून त्या दगावल्या असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
संगमनेर शहर आणि तालुक्याला दुपारी साडेतीन पासून ते पाच वाजेपर्यंत जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून काढणीला आलेला गहू, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. दिवसभर कडक ऊन पडते आणि पहाटे च्या वेळी थंडी जाणवते. बुधवारी दुपारी प्रचंड उकाडा जाणवत होत. अचानक पावसाचे वातावरण तयार झाले आणि दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
तालुक्यातील सावरगाव तळ या गावाला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले तर, अनेक शेतातून पाणी तुडुंब भरून वाहत होते. ओढे - नाले तसेच डोंगर कडेही काही वेळ जोरात वाहू लागले.
या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने काढणीस आलेले गहू, उन्हाळी बाजरी, हरभरा, कांदे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, जीवित हानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. तसेच अनेक ठिकाणी विट भट्टयाचें देखील नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा - आमदार खताळ
तालुक्यातील ज्या गावांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान उद्या गुरुवारी नुकसानग्रस्त गावांचा दौरा करत आमदार अमोल खताळ हे पाहणी करणार आहेत.