स्व. गोपीनाथ मुंढे यांचे अहिल्यानगर जिल्ह्याशी वेगळे ऋणानूबंध - मंत्री विखे पाटील
◻️ नगर महानगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्यास लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंढे यांचे नाव
◻️ स्व. मुंढे साहेब म्हणजे कार्यकर्ता घडविण्याचे विद्यापीठ होते
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | स्व. गोपीनाथ मुंढे यांचे व्यक्तिमत्व हे लोकाभिमुख होते. अहिल्यानगर जिल्ह्याशी त्यांनी वेगळा असा ऋणानूबंध ठेवला होता. जिल्ह्यातील विकासाच्या कामांना त्यांनी नेहमीच सहकार्य ठेवले. शहरातील मार्गाला त्यांचे नाव देण्याचा घेतलेला निर्णय अविरत जनसेवेच्या कार्याची आठवण करुन देणारा आहे. असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील डॉ. ना. ज. पाऊलबुध्दे शाळा ते मुळे एसटीडी पर्यतच्या मुख्य रस्त्यास लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंढे असे नामकरण करण्यात आले. या फलकाचे अनावरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, आ. शिवाजीराव कर्डीले, आ. संग्राम जगताप, अँड. अभय आगरकर, शिवसेनेचे बाबुशेठ टायरवाले, विनीत पाऊलबुध्दे, विनायक देशमुख, रुपाली वारे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
निखील वारे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शहरातील या मुख्य मार्गाला स्व. गोपीनाथ मुंढे यांचे नाव दिल्यामुळे या जिल्ह्यावर त्यांचे असलेल्या प्रेमाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. स्व. मुंढे साहेब म्हणजे कार्यकर्ता घडविण्याचे एक विद्यापीठ होते. प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखण्याची त्यांची हातोटी होती. या जिल्ह्याच्या प्रश्नांप्रती आत्मियता दाखवून ते सोडविण्यासाठी त्यांनी ठेवलेली सहकार्याची भूमिका महत्वपूर्ण ठरली.
मंत्री विखे पाटील यांनी मुंढे साहेबांच्या समवेत अनेक व्यक्तिगत आठवणींना उजाळा देवून सांगितले की, राज्याच्या हितासाठी केलेल्या संघर्षाला स्व. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचीही जोड होती. या दोघांनाही राजकारणात त्या संघर्षाची किंमत मोजावी लागली. परंतू ते आपल्या निर्णयापासून हटले नाहीत. वांबोरी चारीचा प्रश्न असो की, कुकडी कालव्यांच्या कामासाठी त्यांनी निधीची उपलब्धता करुन, दिली हे सुध्दा तेवढेच महत्वचे आहे.
या मार्गाला त्यांचे नाव देणे म्हणजे तळमळीच्या कार्याची आणि अविरत जनसेवेच्या व्रताची आठवण करुन देणारा हा मार्ग ठरेल, त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा येणाऱ्या पिढीला निश्चित मिळेल अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.
आ. संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात या मार्गाला स्व. गोपीनाथ मुंढे यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे स्वागत करुन, नगरसेविका रुपाली वारे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन केले. या प्रभागाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिले जाणार नाही असेही त्यांनी आश्वासित केले.
याप्रसंगी बोलताना निखील वारे यांनी विडी कामगार महीलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची गरज व्यक्त करुन, निर्मलनगर येथील उंच पाण्याच्या टाकीचे तात्काळ संचालन करण्याबाबतची मागणी केली. विद्युत तारा भूमीगत करण्याच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधून प्रभागातील समस्यांसाठी कटीबध्द राहण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमास बाळासाहेब पवार सुनिल त्र्यंबके, रामदास आंधळे, उषाताई नलावडे, संध्या पवार, पल्लवी जाधव, गोकूळ काळे, संगीता खरमाळे, सचिन पारखी, निर्मल थोरात, राधाताई भोसले यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि प्रभागातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रा. अनिल काळे यांनी मानले.