भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या अडकला पोल्ट्री शेडमध्ये!
◻️ महिलेने प्रसंगावधान राखत पोल्ट्री शेंडच्या दरवाजाला बाहेरून लावली कडी
◻️ संगमनेर तालुक्यातील खरशिंदे शिवारात भरदिवसा घडली घटना
◻️ वनविभागाने बिबट्याला घेतले ताब्यात
संगमनेर LIVE (आश्वी) | भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या पोल्ट्री शेडमध्ये जाऊन अडकला. ही घटना मंगळवारी (दि. ८) सकाळी संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील वाबळे वस्तीवर घडली असून वन विभागाने या बिबट्याला जेरबंद करत स्थानिकांची दहशतीतून मुक्तता केली.
याबाबत जेष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी कळविलेली माहिती अशी की, खरशिंदे शिवारात असलेल्या वाबळेवाडी येथे नामदेव सुकदेव वाबळे यांच्या मालकीचे कुक्कुटपालन करण्यासाठी उभारण्यात आलेले पोल्ट्री शेड आहे. यामध्ये मंगळवारी सकाळी एका बिबट्याने शिरुन अनेक कोंबड्यांचा फडशा पाडला.
यावेळी नामदेव वाबळे व त्यांची पत्नी सविता वाबळे यांना बिबट्याची चाहूल लागली असली तरी, तो पोल्ट्री शेडमध्ये असेल यांची पुसटशी ही कल्पना त्यांना नव्हती. मात्र, पाण्याची नळी निघाल्याने सविता वाबळे या पोल्ट्री शेडमध्ये गेल्या असता तेथे दबा धरून बसलेला बिबट्या त्यांना दिसला. त्यामुळे त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत त्या ठिकाणाहून काढता पाय घेत पोल्ट्री शेडच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि पुढील अनर्थ टळला.
याबाबतची माहिती कुटुंबाला व त्यानंतर वनविभागाला कळवण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनास्थळी जाऊन बिबट्याला जेरबंद केले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दरम्यान दिवसेंदिवस बिबट्यांचा अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वावर वाढला आहे. त्यामुळे मनुष्य व पशुधनावर हल्ले वाढत चालल्यामुळे भविष्यात बिबट्ये आणि मानव यांचा संघर्ष तीव्र होण्याची भीती जेष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी व्यक्त केली आहे.