शिवसेनेत प्रत्येकाचा मानसन्मान ठेवला जाईल - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर खुर्द येथील ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि झोळे गावचे उप सरपंच शिवसेनेत दाखल
◻️ खासदार भाऊसाहेब वाकचौरे फोनही उचलत नसल्याचे म्हणत शिवसैनिकानी केले अनेक गंभीर आरोप
◻️ गटबाजी खपवून घेणार नसल्याची शिवसैनिकाना आमदार खताळ यांची तंबी
संगमनेर LIVE | मी जरी आमदार असलो तरी, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. शिवसेनेत सर्व जण स्वतःला कार्यकर्ता समजून काम करत असतात. शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचा मानसन्मान ठेवला जाईल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर खुर्द गटातील शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे उप तालुकाप्रमुख निलेश गुंजाळ गण प्रमुख संकेत खुळे, सचिन पावबाके, पांडुरंग कानवडे यांच्यासह झोळे गावचे विद्यमान उप सरपंच मेजर गोविंद खर्डे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, रमेश काळे, शहरप्रमुख दिनेश फटांगरे, गणप्रमुख श्याम राहणे, उप शहरप्रमुख अजित जाधव यांच्यासह संगमनेर खुर्द, रायतेवाडी निमगावपागा येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर खुर्द गटातील अनेक शिवसैनिकांची उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती आज पूर्ण झाली आहे. मी जरी या तालुक्याचा आमदार असलो तरी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. उप मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा वारसा पुढे चालवत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकद वाढत आहे.
सर्वसामान्यांची कामे त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. संगमनेरमध्ये सर्वसामान्यासाठी लवकरच आपले संपर्क कार्यालय सुरू होत आहे. त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः उप मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे येणार आहेत. तेव्हा असंख्य तरुण शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नवीन आलेल्यांना कधीच नवीन जुने असे जाणवणार नाही. सर्व शिवसैनिक हे नेते नव्हे तर कार्यकर्ते आहे असे मानून काम करा. शिवसेना हा आपला परिवार आहे. समाजातील सर्व घटकातील लोकांची कामे झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील रहा.
गटबाजी कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही अशी तंबी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देत आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर खुर्द गटातील आणि गणातील काही विकासाचे प्रश्न बाकी असतील ते सर्व करण्यासाठी कटिबद्ध राहील. लवकरच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आभाराचा मेळावा घ्यायचा आहे. त्यावेळी सुद्धा संख्येने तरुण शिवसेनेत प्रवेश करणार आहे. आगामी काळात तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे त्या दृष्टीने सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे असा ही सल्ला आमदार खताळ यांनी शिवसैनिकांना दिला.
आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अनेक दिवसापासून उद्धव ठाकरे गटाचे काम करत होतो. परंतु आम्हाला कधी मान सन्मान दिला नाही. तसेच या गटाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना आम्ही निवडून आणले. परंतु ते आता आम्हाला विचारत नाही आणि आमचा फोनही उचलत नाही. असा गंभीर आरोप करत जर आपल्याला या पक्षात कोणी विचारत नसेल तर राहून उपयोग तरी काय? असे मानून आम्ही सर्व शिवसेना पदाधिकऱ्यासह असंख्य शिवसैनिकांनी आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती निलेश गुंजाळ व संकेत खुळे यांनी दिली.
मागील अनेक वर्षापासून माझ्या झोळे गावचा विकास झाला असता तर झोळे गावाचा कायापलट झाला असता. परंतु चाळीस वर्षात गावाचा विकास झाला नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी आपण आमदारा अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे झोळे गावचे उप सरपंच गोविंद खर्डे यांनी सांगितले.