संगमनेरमधून सर्वाधिक शिवसेना सदस्य नोंदणी करणार - आमदार अमोल खताळ
◻️ शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी मोहिमचा शुभारंभ
संगमनेर LIVE | गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी मोहीमसुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे उत्तर महाराष्ट्रामध्ये संगमनेरातून सर्वाधिक शिवसेना सदस्य नोंदणी करणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
शिवसेना संघटनात्मक बळकटीकरणासाठी आणि संगमनेर तालुक्यातील शिवकार्य सदस्य नोंदणीच्या आढाव्यासाठी हॉटेल वेदस येथील सभागृहात शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ व शिवसेना पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत आमदार खताळ बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, विठ्ठलराव घोरपडे, विजय काळे, सौ. सुनीता शेळके, कावेरी नवले, शुभम वाघ, रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, रमेश काळे, विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, मंजाबापू साळवे, सुशील शेवाळे, सौरभ देशमुख, अजित जाधव, रणजीत जाधव, दिपाली वाव्हळ, वैशाली तारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकर्याच्या मुलावर विश्वास टाकून उमेदवारी दिली. अन या तालुक्यात परिवर्तन झाले. त्यामुळे शिवसेनेत सुद्धा बदल झाला आहे. जो पक्षात प्रामाणिक पणे काम करेल त्याला पक्षात स्थान दिले जाईल. संगमनेरला शिवसेनेचा अधिकृत आमदार आहे. त्यामुळे येथून पुढे मला न विचारता कोणीही परस्पर शिवसेना पदाधिकाऱ्याची नियुक्ती करू नये, केल्या तर ते सहन केले जाणार नाही. अशी तंबी आमदार खताळ यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याना दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक शिवसैनिकाचा मानसन्मान ठेवला जातो. लोकांची कामे झाली तर संघटना आपोआपच वाढत असते. तुमचे काम जर चांगले असेल तर तुम्हाला कोणीच काही करू शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आपल्याला भक्कम साथ आहे.
त्यामुळे आमदार झाल्यानंतर सर्व प्रथमच जिल्हा नियोजनातून ११ कोटीचा निधी आणला आहे. त्या निधीतूनच विकास कामे सुरू केली आहेत. त्यामुळे तुम्ही निधी बाबत अजिबात काळजी करू नका. शिवसेना पक्षात ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले जात आहे. शिवसेना पक्ष मर्यादित न ठेवता तो वाढला पाहिजे. यासाठी प्रत्येक घराघरात शिवसैनिक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन आमदार खताळ यांनी केले.
सूत्रसंचालन शिवसेनेचे तालुका संघटक मंजाबापू साळवे यांनी केले. तर आभार शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी मानले.
संगमनेर तालुक्यात पूर्वी आपली सत्ता नसताना शिवसैनिकाचे कोणी ऐकत नव्हते, त्यांचे कामे करत नव्हते. परंतु गेली चाळीस वर्षापासून या तालुक्यावर साखर सम्राटांची साम्राज्य होते. ते साम्राज्य आमदार अमोल खताळ यांनी उध्वस्त करून या तालुक्याला त्यांच्या रूपाने शिवसेनेचा आमदार मिळाला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची खऱ्या अर्थाने ताकद वाढली आहे. सर्व सामान्य जनतेनेचे शिवसेना पक्षाला वैभव मिळून दिले आहे. ते वैभव टिकून ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. असे शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजेंद्र चौधरी यांनी म्हटले.
आमदार अमोल खताळ यांच्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सर्वाशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून अमोल खताळ यांची ओळख निर्माण झाली आहे. ते आपली कामे करत राहतील परंतु, आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका आपल्याला जिंकायच्या असेल तर, शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शिवसैनिकांनी सदस्य नोंदणीवर भर द्यावा. असे आवाहन माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.