मांडवे येथे पत्रकाराच्या मदतीने स्विकारली ५० हजारांची लाच
◻️ संगमनेर तालुक्यातील पठार भागातील त्या? पत्रकाराचा प्रताप
◻️ नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
संगमनेर LIVE | पठार भागातील तलाठी अक्षय ढोकळे याने एका युट्यूब चॅनलच्या पत्रकाराच्या मध्यस्थीने राहुरी येथील खडी व्यवसायिकाकडून ५० हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. त्या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले असून ज्या तलाठ्यासाठी ही लाच स्विकारण्यात आली, त्याला मात्र या प्रकरणाची कुणकुण लागल्यापासून तो पसार झाला आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही एका युट्यूब चॅनलचा पत्रकार म्हणून मिरवत असतो.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील एक व्यावसायिक ट्रक द्वारे खडी वाहतूक करण्याचा व्यवसाय करत आहे. खडी वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी आणि ट्रक वर कारवाई न करण्यासाठी आरोपी रमजान नजीर शेख (वय - २८, रा. मांडवे, ता. संगमनेर) यांने तलाठी अक्षय ढोबळे (सजा मांडवे) यांच्यासाठी दि. १६ एप्रिल रोजी तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपी अक्षय ढोकळे (तलाठी) यांना आरोपी रमजान शेख यांला भेटून मी पन्नास हजार रुपये देतो, पण माझे खडी वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई करू नका व सुरळीत राहू द्या असे सांगितले. त्यानंतर आरोपी तलाठी अक्षय ढोबळे यांनी मी पैसे घेतो पण, गाड्या फक्त दोन महिने चालतील असे म्हणून लाच स्विकारण्यास संमती दिली.
त्यामुळे आरोपीच्यावतीने ५० रुपये लाचेची रक्कम आरोपी रमजान नजीर शेख यांनी दि. १६ एप्रिल रोजी ८.३९ वाजेच्या सुमारास मारुती मंदिर समोर (मांडवे, ता. संगमनेर) येथे स्विकारली आहे. तसेच आरोपी लोकसेवक अक्षय ढोकळे यांना लाचेची रक्कम स्विकारण्याबाबत दूरध्वनीवरून कळवून काय करू? असे विचारले असता त्यांनी ठीक आहे उद्या बघू असे म्हणून लाच स्विकृतीस संमती दिलेली आहे. त्यामुळे यावेळी रमजान शेख याला ताब्यात घेतले आहे.
यावेळी आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ व १२ प्रमाणे घारगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. याप्रसंगी पोलीसांनी आरोपीकडून ५० हजार रुपये व मोबाईल जप्त केला आहे.
दरम्यान ही कारवाई नाशिक परीक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार सुनिल पवार, पोलीस नाईक योगेश साळवे, परशुराम जाधव यांच्या पथकाने केली.