◻️ आमदार अमोल खताळ यांचे संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव पोलीस ठाण्याला स्पष्ट निर्देश
◻️ आमदार अमोल खताळ अँक्शनमोडवर आल्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारीचा बीमोड होणार?
संगमनेर LIVE | संगमनेर शहरासह तालुक्यात सुरू असणारे अवैध धंदे आणि अनाधिकृत कत्तलखान्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश ठेवण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांनी करावे. तसेच शहरात सुरू असणारे अवैध धंदे बंद करून अनधिकृत चालणारे सर्व कत्तलखाने उध्वस्त करावे. असे सक्त निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहर, तालुका व घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर शहरातील शासकीय विश्राम गृहावर संगमनेर शहर, तालुका आणि घारगाव या तीनही पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी बाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीला संगमनेर उप विभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, आणि घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या तक्रारदार यांच्या बरोबर कर्मचारी यांचे वर्तन सभ्यपणाचे असावे, उद्धटपने वागू नये. अशा सूचना यावेळी आमदार खताळ यांनी दिल्या आहेत.
आमदार खताळ म्हणाले की, मागील काही दिवसापूर्वी शहरात सुरू असणारे सर्व अनाधिकृत कत्तलखाने उध्वस्त केले होते. पोलीसांनी मागील आठवड्यात तीन ते चार ठिकाणी कत्तलखान्यावर कारवाया केल्या आहेत. यापुढे अशा ठिकाणी निदर्शनास आल्यावर ज्या हद्दीत असतील तेथील प्रशासनाने, नगर पालिका प्रशासनाने नोटीसा देऊन शहरात सुरू असणारे अनधिकृत कत्तल खाने उध्वस्त करण्यात यावे. तसेच शहरात मटका, जुगार, अवैध दारू, अमली पदार्थ, गुटखा, ऑनलाईन लॉटरी हे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे. अशा सुचेना दिल्या.
त्याचबरोबर अवैध धंदे करणारे कोणी ही असो, त्यांचा बंदोबस्त करावा. अवैध धंद्यांना कुठल्याही प्रकारचे पाठबळ दिले जाणार नाही असे ही आमदार खताळ यांनी ठणकावून सांगितले. शहर तालुका आणि घारगाव या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब तसेच बेकायदेशीर चक्री, ऑनलाईन लॉटरी सुरू आहे. त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी अशा सूचना तीनही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
संगमनेर तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आत्तापर्यंत किती घर फोड्या, चोऱ्या, चैन स्केचिंग झाल्या. यातील दाखल गुन्ह्यापैकी किती गुन्हे उघडकीस आले आणि किती आले नाही याबाबतचा सविस्तर आढावा तीन ही पोलीस ठाण्याच्या प्रमुखांकडून घेण्यात आला.
संगमनेर शहरातील अकोले नाका येथे मागील आठवड्यात काही अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींनी मारहाण केली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. ते पुन्हा असे कृत्य करणार नाही यासाठी वेळप्रसंगी त्यांची गावातून धिंड काढावी अशा ही सूचना आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
ज्या कत्तल खाण्याच्या चालक मालकांवर वारंवार गुन्हे दाखल होऊन कारवाया केलेल्या आहेत. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी या कलमाखाली कारवाई करून तडीपार करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या.