विद्यार्थी व लेखकांसाठी लेखन कार्यशाळाचे आयोजन - सौ. दुर्गाताई तांबे
◻️ विद्यार्थ्याना अभिरुप वाचन अनुभव मिळणार - डॉ. मालपाणी
◻️ महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, संपादक, कलावंत आदि करणार मार्गदर्शन
संगमनेर LIVE | अ. भा. मराठी साहित्य संस्था, शाखा संगमनेर व लाडोबा मासिक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी, लेखकांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमता अधिक उंचावल्या जाव्यात, लेखनामध्ये समृद्धता यावी या दृष्टीने विद्यार्थ्यांना योग्य ते मार्ग दर्शन व्हावे यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तसेच अनेक लेखक आपले लेखन प्रकाशित करत आहेत. या निमित्ताने लेखकांना आपल्या वांड:मय साहित्य प्रकारात अधिक उत्तम दर्जांचे लेखन करता यावे. लेखनामध्ये नेमकेपणाने काय असायला हवे त्या दृष्टीने मार्गदर्शन होण्यासाठी सदरची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये प्रत्यक्षपणे लेखन करून घेणे, त्याचबरोबर विषयानुरूप कविता, कथा, ललित यांचे लेखन नेमके कसे करावे? या स्वरूपामध्ये अनुभव दिले जाणार आहेत. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील नामवंत पुरस्कार प्राप्त साहित्यिक सहभागी होणार आहेत. २६ व २७ एप्रिल रोजी संगमनेर येथे कार्यशाळा संपन्न होणार आहे.
नव्याने लिहू पाहणारे आणि यापूर्वी लेखन केलेल्या सर्वांनाच कार्यशाळेमध्ये मोफत प्रवेश असणार आहेत. या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व लेखकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यशाळेसाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी प्रकल्प संयोजक दत्तात्रय आरोटे, शांताराम डोंगरे, मुकुंद डांगे, श्रीमती स्मिता गुणे, तुषार गायकर, शाखेचे सचिव संदीप वाकचौरे, यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रा. डॉ. संजय दळवी, डॉ. संतोष खेडलेकर, भुजबळ, घनश्याम पाटील, जोशी यांनी केले आहेत.
हे आहेत मार्गदर्शक
बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्षा साहित्यिक डॉ. शकुंतला काळे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथराव आव्हाड, ऐश्वर्य पाटेकर, सिने गीतकार ज्योती घनश्याम, महाराष्ट्रातील नामवंत कवी शशिकांत शिंदे, ज्येष्ठ संपादक प्रकाशन घनश्याम पाटील, डॉ. संतोष खेडलेकर, नागेश शेवाळकर, प्रशांत केंदळे आदी मान्यवर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यार्थ्याना अभिरुप वाचन अनुभव मिळणार - डॉ. मालपाणी
या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत अभिरूप वाचन करणारे वाचक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नेमके पणाने कसे लिहावे? कविता लेखन करताना रचना कशी असावी, बालसाहित्य लिहिताना कोणती काळजी घ्यावी. मुलांनी लिहिताना काय विचार करावा? यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. पुस्तक प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले असून पुस्तक खरेदी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संजय मालपाणी यांनी केले आहे.