डॉ. आंबेडकराचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचे तत्व जपा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
डॉ. आंबेडकराचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचे तत्व जपा - बाळासाहेब थोरात

◻️ मानवतेचा विचार धोक्यात आल्यामुळे क्रांती घडविण्यासाठी सज्ज होण्याचे केले आवाहन 

◻️ संगमनेर येथे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी



संगमनेर LIVE | राष्ट्रपिता महात्मा गांधी व राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भारतीय सुपुत्रांनी जगाला शांततेचा व समतेचा मंत्र दिला. मानवाच्या समान हक्कासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर लढले गेलेल्या संघर्षांमध्ये या दोन नेतृत्वाची प्रेरणा होती. सर्व संत, समाजसुधारक यांचे विचार एकत्र करून समतेची राज्यघटना निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे किमयागार होते. त्यांनी दिलेली भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होऊ देऊ नका, याचबरोबर समता, बंधुता व स्वातंत्र्य हे तत्व जपा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर. कदम, श्रीमती कुसुमताई माघाडे, उत्कर्षाताई रुपवते, सुधाकर रोहम, रामहरी कातोरे, उपाध्यक्ष के. एस. गायकवाड, डॉ. शशिकांत माघाडे, सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल, ॲड. अमित सोनवणे, गौतम गायकवाड, प्रा. श्रीरंग तलवारे, डॉ. राहुल हांडे, भास्कर बागुल, बाळासाहेब घोडके आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य बी. आर. कदम व त्यांच्या पत्नीचां जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ज्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही. ज्यांना तिरंगा मान्य नाही. अशी लोक राज्यघटना ही सत्तेसाठी पायरी समजत आहे. त्यांना पुन्हा जुने दिवस आणायचे आहेत. त्यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होणार नाही. यासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून जगामध्ये समतेच्या क्रांती झाल्या. अमेरिकेमध्ये काळा गोरा भेद मिटवण्यासाठी मार्टिन ल्युथर किंग यांनी क्रांती घडवली. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांनी मानवतेतील भेद मिटवण्याचा लढा दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवतेचा मंत्र जपणाऱ्या या महापुरुषांनी भारताला समतेची राज्यघटना दिली.

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर, सर्व संत, समाजसुधारक यांचा मानवतेचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये उतरवला आहे. हा विचार सध्या धोक्यामध्ये आला आहे. पुन्हा क्रांती घडवण्याची गरज आहे. राज्यघटनेचा विचार सर्वसामान्य माणूस, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा. सध्या सोशल मीडियाचा वापर करून खोटे नाटे पसरवले जात आहे. धर्माच्या नावावर भेद करण्याचा वनवा पेटला आहे. तो विजवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

आ. सत्यजित तांबे म्हणाले की, भारतीय संविधान हा देशाचा विश्वास आहे. उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेने सदैव काम केले असून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने भारताचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती हा एक अभिमानाचा क्षण आहे. देशाचे संविधान ही जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून ७५ वर्षांमध्ये १४० दुरुस्त्या झाल्या मात्र कधीही घटनात्मक पेच निर्माण झाला नाही, हे या राज्यघटनेचे मोठे यश आहे. मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक क्रांती झाल्या असून आज राज्यघटनेमुळे विविध क्षेत्रात सर्व समाजातील घटकांना संधी मिळत आहे. राज्यघटना व त्याचे तत्व जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान याप्रसंगी विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. राहुल हांडे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गायकवाड यांनी केले.

तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात जयंती साजरी..

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात संगमनेर हायटेक बस स्थानक, रिक्षा स्थानक, जोर्वे, वडगाव पान, तळेगाव दिघे, राजापूर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, यशोधन जनसंपर्क कार्यालय, घुलेवाडी अशा विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात महामानवाला अभिवादन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !