संगमनेर शहरात राम कथेनिमित्त आयोजित शोभायात्रा उत्साहात संपन्न
◻️ प्रभू श्रीराम यांची पालखी खांद्यावर घेऊन सौ. निलम खताळ झाल्या सहभागी
संगमनेर LIVE | गोवत्स प. पू. श्री राधाकृष्ण महाराज यांच्या वाणीतून आज पासून ९ दिवस श्रीराम कथा होत आहे. त्यानिमित्त संगमनेर शहरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेने संपूर्ण संगमनेर शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमले.
गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या वाणीतून शहरात आज १ एप्रिल पासून ९ एप्रिलपर्यत श्रीराम कथा सुरू होत आहे. त्या कथेच्या शुभारंभानिमित्त संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात राधाकृष्ण महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामची आरती करण्यात आली.
‘प्रभू रामचंद्र की जय’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ असा जयघोष करत सवाद्य शोभायात्रेला सुरुवात झाली. महिला भगिनी डोक्यावर तुळस घेऊन भगवंत नामाचा जप करत या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘राम आयेंगे आयेंगे आ जायेंगे’ शबरी - रामल्लाच्या गाण्यावर महिलांनी टाळ आणि टाळ्यांचा ठेका धरत भजन गायले.
यावेळी शहरातील चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिरापासून निघालेली शोभायात्रा रंगार गल्ली, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका, बाजारपेठ, तेली खुंट मेनरोड, विठ्ठल मंदिर, चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, नाशिक रोड मार्गे मालपाणी लॉन्स अशी शोभायात्रा काढण्यात आली.
दरम्यान या शोभायात्रेत आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ या प्रभू श्रीराम यांची पालखी खांद्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी महिला भाविकांबरोबर फुगडी खेळण्याचाही आनंद देखील लुटला.
नऊ दिवस चालणार राम कथा..
श्रीराम कथेमध्ये पहिला दिवस श्रीराम कथा महात्मे, दुसरा दिवस शिव पार्वती विवाह, तिसरा दिवस श्रीराम जन्मोत्सव, चौथा दिवस बाललीला आणि धनुष्य यज्ञ, पाचव्या दिवशी श्रीरामलल्ला आणि माता जानकी यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तर, सायंकाळी मिरवणूक हे मुख्य आकर्षण ठरणार आहे. सहावा दिवस वनवास प्रसंग संवाद, सातवा दिवस श्रीराम भरत शबरी भेट, आठवा दिवस रामचरित्र लंका विजय, नववा दिवस श्री प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक सोहळा होऊन या राम कथेची सांगता होणार आहे.