अहिल्यानगर येथे जैन अल्पसंख्याक विकास योजना आढावा बैठक संपन्न
◻️ आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतला योजनांचा आढावा
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच योजनांची समाजामध्ये सर्वदूर प्रचार, प्रसिद्धी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार आदी उपस्थित होते.
ना. ललित गांधी म्हणाले, राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वागिण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा. पंतप्रधान जनविकास कार्यक्रमातून पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. अहिल्यानगर शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळांमध्ये असलेल्या जैन मंदिराच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याबरोबरच महामंडळाच्या कार्यालयासाठी शहरामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. जैन समाजातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठीही जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. जैनधर्मीय साधु-संत पायी फिरत असतात. त्यांच्यासाठी विहारधाम बांधण्याचे प्रस्तावित असून त्यासाठीही जागा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना गांधी यांनी यावेळी केल्या.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांनी संबंधित विषयांचे विस्तृत सादरीकरण केले. तसेच अल्पसंख्यांक विभागामार्फत योजना राबविताना येणाऱ्या अडचणी अध्यक्षांसमोर मांडल्या.
व्यापारी, उद्योजकांसोबत साधला संवाद..
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जैन समाजातील व्यापारी, उद्योजकांसमवेत संवाद साधला. व्यापारी व उद्योजकांच्या समस्या समन्वयाने सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असून व्यापारी, उद्योजकांच्या विकासासाठी सर्वांनी संघटीत होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.