सहकार चळवळीतील बिनविरोध यशाचे साक्षीदार वयोवृद्ध शेतकरी
◻️ निमोण येथे ज्येष्ठांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिला आशिर्वाद
संगमनेर LIVE | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास बिनविरोध झालेल्या निवडणुकीनंतर निमोण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात वयोवृद्ध शेतकऱ्यांनी माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीत भावनिक वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक दशकांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक ज्येष्ठ , सभासद नागरिक व शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधत जुन्या आठवणीना उजाळा देऊन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
निमोण येथे कारखाना सभासद शेतकरी व युवक यांच्या स्नेह मेळाव्या प्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “ही निवडणूक म्हणजे सहकार चळवळीवरील लोकांचा विश्वास आहे. वयोवृद्ध शेतकऱ्यांचा अनुभव आणि आशीर्वाद हेच आमचं खरं बळ आहे.” कार्यक्रमात वयोवृद्धांनी आपल्या भावना व्यक्त करत थोरात कुटुंबाच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.
काहींनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासोबतचे अनुभव सांगत जुन्या काळातील सहकार्याची आठवण करून दिली. याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत, त्यांचा सन्मान केला. “वयोवृद्ध शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि अनुभव हीच खरी संपत्ती आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणा देतं,” असं ते म्हणाले.
कार्यक्रमात वातावरण अत्यंत उत्साही आणि भावनिक होतं. उपस्थित वयोवृद्ध सभासद व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य झळकत होतं.
या कार्यक्रमात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ शेतकरीही होते, जे गेली अनेक दशके सहकार क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्यासोबत केलेल्या सहकार चळवळीच्या आठवणीही सांगितल्या. यावेळी पुढील पिढी असणारी युवकांची उपस्थिती मोठी होती.
“विधानसभेत लोक नेतृत्वाचा पराभव नको होता”
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा मोठा घात झाला आहे. या स्नेहसंवाद मिळाव्यात एका वयोवृद्ध शेतकऱ्याने माजी मंत्री थोरात यांची भेट घेतली. “खऱ्या अर्थाने थोरात साहेबांचा पराभव होणे योग्य नव्हते”असे सांगत त्या शेतकऱ्याने बाळासाहेब थोरात यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्या क्षणी सर्व उपस्थितांचे अंतकरण दाटून आले होते.