पहलगाम येथील अतिरेकी हल्ला मानवतेला काळीमा फासणारा - बाळासाहेब थोरात
◻️ अतिरेकी हल्ले हे कलंक - माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
◻️ कॉग्रेसकडून भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध
संगमनेर LIVE | काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारा असल्याची भावना काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
काश्मीर खोऱ्यातील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पहलगाम येथे झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे. यामध्ये निष्पाप २७ भारतीयांचा अतिरेक्यांनी जीव घेतला आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. याबाबत सरकारने ठोस उपाय योजना केल्या पाहिजे. केंद्र सरकारने कलमामध्ये बदल केला. ३७० कलम लागू केले यावेळेस सांगितले वेगळे मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे.
अतिरेकी हल्ला आणि देशाची सुरक्षितता याबाबत सरकारने जास्त जागरूक राहण्याची आवश्यकता होती आणि यापुढे राहील अशी भावना व्यक्त करताना पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
अतिरेकी हल्ले हे कलंक - माजी आमदार डॉ. सुधीर तांबे
काश्मीर खोरे हे देशाचे नंदनवन आहे. दरवर्षी हजारो पर्यटक तेथे जातात. मात्र जातीय द्वेष पसरवण्यासाठी काही संघटना अतिरेकी हल्ले करतात यातून निरपराध नागरिकांचा बळी जातो. काल काश्मीरमध्ये २७ नागरिकांचा विनाकारण बळी गेल्या असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मानवतेसाठी कलंक असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.
दरम्यान सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद, शेतकरी व युवकांच्या गुंजाळवाडी, समनापुर, निमोण व तळेगाव दिघे येथे झालेल्या स्नेहसंवाद मेळाव्यात पहेलगाम येथे मृत पावलेल्या २७ भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.