पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा संगमनेरात काँग्रेसकडून तीव्र निषेध
◻️ पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत काढला कॅण्डल मार्च
संगमनेर LIVE | वंदे मातरम, भारत माता की जय, भ्याड अतिरेकी हल्ल्याचा निषेध असो, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देत संगमनेर काँग्रेसच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कॅण्डल मार्च करून तीव्र निषेध करण्यात आला. याच बरोबर या अतिरेक्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या अशी मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली. तर, भारतीय म्हणून अशा वेळेस सर्वांनी एकत्र या असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व युवक काँग्रेसच्या वतीने पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा कॅडल मार्च काढून निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, फाशी द्या फाशी द्या अतिरेक्यांना फाशी द्या, भारत माता की जय, वंदे मातरम, नही झुके नही झुकेंगे, अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, अतिरेक्यांनी केलेला हल्ला हा भ्याड आणि अत्यंत निंदनीय आहे. खरे तर सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी आत मध्ये आलेच कसे हा मोठा प्रश्न असून या अतिरेक्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे. आतंकवाद हा जगाला लागलेली मोठी कीड असून ही संपवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकत्र यावे. जातिभेद आणि कट्टरतावाद हा मानव जातीसाठी धोकादायक असून या हल्ल्याचा तमाम संगमनेरकर निषेध करत असल्याचे ते म्हणाले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यांमध्ये निर्दोष लोक मारले गेले. भारताचा कॉमन मॅन हा एक एक रुपया जमा करून काश्मीरला भेट देण्यासाठी जात असतो. किंवा त्याचे ते स्वप्न असते. आणि अशा भीतीदायक हल्ल्याने तेथे जीवन संपते. हे चिंताजनक आहे. अशा हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व जाती-धर्म पक्ष यांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. आता वेळ आली आहे ती भारतीय नागरिक म्हणून एकत्र येण्याची. या अतिरेकी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांचा काय दोष होता. २७ निष्पाप नागरिकांचा जीव गेला असून यामध्ये सहा लोक हे महाराष्ट्राचे होते. या अतिरेक्यांना पकडून मृत्युदंड देऊन या हल्ल्याचा बदला सरकारने घेतला पाहिजे असे त्या म्हणाल्या.