लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचा संपन्न
◻️ संगमनेरकरांनी अनुभवला आयपीएलचा थरार
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर क्रिकेट लीग मध्ये झालेल्या अटीतटीच्या अंतिम विरा मोरया ऋग्वेद संघ कोल्हेवाडी चिकणी यांनी विजेतेपद मिळवली असून १ लाख ५१ हजार रुपये ट्रॉफी व संघमालकास पल्सर गाडी देऊन गौरविण्यात आले आहे.
जाणता राजा मैदानावर राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी झालेल्या लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये १२ संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्याच्या वेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, सौ. कांचनताई थोरात, डॉ. जयश्री थोरात आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रीमियर लीग मध्ये अंतिम सामना हा वेल्हाळे येथील उमाजी राजे नाईक प्रतिष्ठान व कोल्हेवाडी चिकणी येथील वीर मोरया ऋग्वेद या संघांमध्ये झाला. अत्यंत रोमहर्षक लढतीमध्ये वीर मोरया ऋग्वेद संघाने विजय मिळवला. या संघास १ लाख ५१ हजार रुपये ट्रॉफी व संघमालकास पल्सर गाडी तर उपविजेत्या वेल्हाळे संघास ७५ हजार १७५ रुपये ट्रॉफी आणि संघ मालकास प्लेटिना गाडी देण्यात आली. तृतीय क्रमांकाच्या युनिक प्रॉपर्टी संगमनेर संघास ५१ हजार १५१ रुपये व ट्रॉफी संघ मालकास एलईडी टीव्ही देण्यात आला. तर चतुर्थ क्रमांकाच्या साई छत्रपती घुलेवाडी संघास ४१ हजार १४१ रुपये व ट्रॉफी आणि संघ मालकास सायकल देण्यात आली.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्यामधून संघ भावना वाढीस लागते. खेळामध्ये हार आणि जीत होतच असते. त्यामधून युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. युवकांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी कायम विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. क्रीडा स्पर्धांमधून युवकांना करियर निर्माण करता येत आहे. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या सदस्यांनी या स्पर्धेचे अत्यंत दर्जेदार आयोजन केल्यामुळे प्रेक्षकांची पसंती या स्पर्धेला मोठी राहिली असल्याचे ते म्हणाले.
आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, सध्या देशात आयपीएलचा हंगाम सुरू आहे आणि संगमनेरमध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियम लीगचा. क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा भरपूर आनंद घेतला. अत्यंत सुंदर आयोजन या युवकांनी केले असून या स्पर्धेमध्ये राज्यभरातील युवकांनी खेळण्यासाठी यावे असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान या स्पर्धेच्या यशस्वी आयोजना करता राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व सदस्यांचा लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.