महिला सुरक्षितता व गुन्हेगारी विरोधात ठोस भूमिका घेणार - डॉ. विखे पाटील

संगमनेर Live
0
महिला सुरक्षितता व गुन्हेगारी विरोधात ठोस भूमिका घेणार - डॉ. विखे पाटील

◻️ कोल्हार भगवतीपुर येथे ‘ना भुतो ना भविष्य’ अशा विशेष ग्रामसभेला विक्रमी गर्दी

◻️ गावकऱ्यांना वेळ देण्याबरोबर त्यागही सहन करण्याचे आवाहन करुन गावाचे चित्र बदलण्याची दिली ग्वाही 

संगमनेर LIVE | दादागिरी व गुंडगिरीबाबत कोल्हार भगवतीपुरने सहनशीलतेची सीमा ओलांडली आहे. गावाचे गावपण संपविण्यात गावकरी जबाबदार आहेत. गावकऱ्यांनो थोडा वेळ द्या, त्यागही सहन करा, गावाचे चित्र बदलून दाखवतो. अशा शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ग्रामस्थांना आधार दिला. तर, मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकी मोठी ऐतिहासिक ग्रामसभा पाहत असल्याचे सांगताना गावाने जर आदर्श पाळला असता तर, ही वेळ आली नसती असे देखील ते म्हणाले.

राहाता तालुक्यातील कोल्हार व भगवतीपूर येथे महिला सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न, तसेच वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, कोल्हारचे सरपंच निवेदिता बोरुडे, भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रेय राजभोज, उप सरपंच प्रकाश खर्डे, डीवायएसपी शिरीष वमने यांच्यासह विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. 

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, गावातील प्लॉटिंग व जमीन व्यवहारात अंदाधुंदी सुरु असून कोण विकतो?, कोण विकत घेतो? याचा तपास न करता फक्त पैशासाठी व्यवहार केले जात आहे. गावातील अवैध धंद्याबाबत “गावात जे अवैध धंदे चालू आहेत ते सांगा, तिथे जेसीबी फिरवला जाईल” असा इशारा त्यांनी दिला. महिला सुरक्षिततेवर बोलताना म्हणाले, “जर पोलिसांकडून न्याय मिळाला नाही, तर कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल.” असे सांगितले.

तसेच गावातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीबाबत त्यांनी पुढील दोन महिन्यांत पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले. कोल्हार भगवतीपुरचे गावपण गावकऱ्यांनीच नष्ट केले असल्याचे सांगतानाच डॉ. विखे यांनी गावकऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची घोषणा करताना प्रत्येक गावकऱ्याने यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

डॉ. खर्डे  म्हणाले, की या गावाची ओळख यापूर्वी संवेदनशील गाव होती. पूर्वीचे हिंदू मुस्लिमांचे वाद आता राहिलेले नाहीत. मात्र आता दादागिरी व गुंडगिरी वाढत चालली आहे. थोरा-मोठ्यांची मानमर्यादा ठेवली जात नाही. विद्यार्थिनींना टारगेट पोरं त्रास देतात. व्यापाऱ्यांना अरेरावी करतात. गावातील भांडणे नामदार साहेब व सुजय दादांकडे गेल्यावर त्याठिकाणी तात्पुरते नमती घेतात परंतु, गावात आल्यावर पुन्हा त्यांची दादागिरी सुरू होते. आम्ही राजकीय गट विसरून गावकऱ्यांबरोबर राहू असे आश्वासन त्यांनी दिले. 

सुरेंद्र खर्डे म्हणाले, की भगवती देवीच्या पावन भूमीवर अशी सभा घ्यावी लागते हे दुर्दैव आहे. सुजयदादांनी सांगितले होते, की सभेला मी स्वतः हजर राहील. गुंडगिरीपायी वस्त्यांवरील शेतकऱ्यांपुढे गावात येण्याची भीती असते. दोन-तीन वर्षापासून गावातून मुली पळून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. ग्रामसुरक्षा दल स्थापन करा, सुजयदादा व पोलीस अधिकारी आपल्याबरोबर असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान याप्रसंगी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !