‘सायरन’ ‘ब्लॅकआऊट’ हे शब्द कालपासून तुमच्या कानावर आदळत आहे ना?
◻️ तब्बल ५४ वर्षांपूर्वीही पाकीस्तान युध्दावेळी घडलं होतं असचं, त्यानुषंगाने श्रीरामपूर येथील ‘सायरन’ म्हणजे ‘भोगा’ व ‘ब्लॅकआऊट’ ची आठवण
संगमनेर LIVE | श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगा दिवसातून दोनदा वाजायचा. सकाळी सहा वाजता होणारा भोंगा बहुसंख्य लोकांच्या ध्यानीमनीही नसायचा.
रात्री साडेआठ वाजता होणारा भोंगा मात्र सगळ्यांच्या कानी पडायचा आणि त्यानुसार ते त्यांचा त्या दिवसाचा दिनक्रम आटपून घेण्याच्या तयारीला लागत असत.
आमच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर दूर असलेल्या, बाजारतळापाशी असलेल्या नगरपालिकेच्या संगमनेर रोडवरच्या ओपन थिएटर आवारातून हा भोंगा वाजत असे.
त्याकाळी म्हणजे साठ आणि सत्तरच्या दशकांत मर्यादित सीमाहद्दी असलेल्या आणि ध्वनीप्रदूषण ही चीज ठाऊक नसलेल्या श्रीरामपूर शहराच्या बहुतेक सर्व भागांत या भोंग्याचा आवाज व्यवस्थितपणे ऐकू यायचा.
कुठल्याही प्रकारची फार मोठी स्थानिक उद्योगकंपनी नसलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या श्रीरामपुरात दिवसातून दोनदा वाजल्या जाणाऱ्या या भोंग्याचे नक्की प्रायोजन काय होते ते मला कधीच कळाले नाही.
या शहराच्या आसपास हरेगावची ब्रिटिशकालीन बेलापूर शुगर फॅक्टरी आणि टिळकनगरची महाराष्ट्र शुगर फॅक्टरी हे दोन खाजगी साखर कारखाने आणि अशोकनगरचा सहकारी साखर कारखाना होता.
पण या तिन्ही साखर कारखान्यांचा आणि नगरपालिकेच्या या भोंग्याचा काडीएक संबंध नव्हता.
पण आम्हा शहरवासियांच्या दैनंदिन जीवनात या भोंग्याला निश्तितच काहीतरी महत्त्वाचे स्थान होते हे नक्की.
इतर रहिवाश्यांप्रमाणेच सकाळच्या भोंग्याकडे माझेही कधी फार लक्ष गेले नाही पण रात्रीच्या साडेआठच्या भोंग्याची काही वेगळी बाब होती.
रात्री साडेआठ वाजता पालिकेचा तो भोंगा वाजला कि दादा लगेच दुकान आवरायला लागायचे, त्या सोनार लेनमधली आजूबाजूची दुकानेसुद्धा पटापटा बंद व्हायला लागायची.
नगरपालिकेचा रात्री साडेआठचा तो भोंगा अशाप्रकारे सर्व दुकानदारांना आपापली दुकाने बंद करण्याची आठवण करुन द्यायचा.
गंमत म्हणजे याकाळात आमच्या आणि इतर सर्व दुकानांत भिंतीवर टांगलेली घड्याळे असायची, बहुतेकांकडे मनगटी घड्याळ असायचे. असे असले तरी रात्री दुकाने बंद होण्यासाठी त्या भोंग्याचाच आदेश पाळला जायचा.
हा, बुधवारचा मात्र एक अपवाद असायचा. दर बुधवारी अनेक दुकाने रात्री आठ वाजण्याआधीच बंद व्हायची, याचे कारण म्हणजे त्याकाळात रेडीओ सिलोनवरून प्रसारीत होणारी अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा नवनवीन हिट हिंदी चित्रपट गाण्यांचा त्याकाळचा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम.
त्यादिवशी रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत घरांघरांत कुटुंबातली सर्व लहानथोर मंडळी रेडिओवरचा हा कार्यक्रम कान देऊन ऐकत असायची. देशात कृष्णधवल टेलिव्हिजनचे आगमन होण्यास त्यानंतर आणखी एक तप म्हणजे दहाबारा वर्षांचा अवधी होता.
त्याशिवाय महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला ३० जानेवारीला सकाळी बरोबर अकरा वाजता हा भोंगा वाजायचा, त्यावेळी असेल त्या जागी एक मिनिट स्तब्ध राहून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करावी अशी अपेक्षा असायची. आम्ही मुले शाळेत असताना अशाप्रकारे गांधीजींचे स्मरण करायचो.
तर श्रीरामपूर पालिकेचा रात्री साडेआठचा हा भोंगा कधी काही कारणाने वाजला नाही असे कधी व्हायचे नाही.
मात्र अचानक काही काळ श्रीरामपूर नगरपालिकेचा हा भोंगा दिवसाअपरात्री, वेळीअवेळी वाजू लागला. नेहेमीच्या परिचयाच्या त्या भोंग्यांच्या अशा कधीही वाजण्याने सुरुवातीला काही दिवस लोकांची घबराट व्हायला लागली.
अर्थात हे भोंगे असे वेळीअवेळी का वाजतायेत हे एव्हाना लोकांना माहित झाले होते.
पन्नास वर्षांपूर्वीचे म्हणजे १९७१ सालच्या डिसेंबर महिन्याचे ते दिवस होते आणि त्यावेळी भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला होता.
भारताचे पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे शत्रुपक्षाकडून कुठल्याही भारतीय मुलखावर कधीही हल्ला होऊ शकतो, त्यामुळे अशा हल्ल्यास लोकांनी कसे तोंड द्यायचे याची रंगीत तालिम म्हणून असे भोंगे अचानक वाजवले जात असत.
‘युद्धस्थ कथा रम्य' असे एक सुभाषित असले तरी युद्धाच्या छायेत राहाणे तितके सोपे नसते.
तीन डिसेंबरपासून सुरु झालेल्या या युद्धाच्या काळात सीमाहद्द वगळता भारताच्या कुठल्याही मध्यवर्ती प्रदेशांत सैनिकी किंवा बॉम्ब हल्ले झाले नाहीत,
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हे आमचे शहर देशाच्या कुठल्याही सिमेवर नाही, त्यामुळे या भागात विमानांतून शत्रुह्ल्ला होण्याची शक्यता फार धूसर होती. तरीदेखील खबरदारी म्हणून देशाच्या विविध प्रदेशांत अशी काळजी घेतली जात असावी.
त्यावर्षी मी सहावीला शिकत होतो. मात्र ज़िल्हा परिषदेच्या आमच्या जीवन शिक्षण मंदिर (खटोड) शाळेत दररोज सकाळी सामुहिक प्रार्थनेच्या वेळी वृत्तपत्रांतील प्रमुख काही बातम्यांचे मथळे वाचले जायचे.
हे मथळे वाचणाऱ्या तीनचार विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश होता, त्यामुळे सकाळीच वृत्तपत्राचे पहिले पान नजरेखालून घालावे लागे.
याच काळात भारताच्या पूर्व सिमेवर अचानक भारतीय सेनेच्या मोठ्या कारवाया सुरु झाल्या होत्या आणि त्यासंबंधीच्या बातम्या विशेषतः भारतीय लष्कराच्या मदतीने आगेकूच करणाऱ्या बांगला 'मुक्ती बाहिनी'च्या फौजेला मिळणारे यश याबाबतच्या बातम्या वाचणे खूपच रोमांचकारी असायचे.
त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच वृत्तपत्रे वाचायची सवय लागली, ती कायमची लागलीच.
सत्तरच्या दशकात तंत्रज्ञान आणि युद्धशास्त्र आजच्या इतके प्रगत नव्हते. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे परस्परांच्या हद्दीत खूप आत जाऊन बॉम्बहल्ला करु शकत नव्हती.
विमानाच्या हालचाली अचूक टिपणारी रडार यंत्रणा तोपर्यंत विकसित झाली होती, मात्र तरीही रडार यंत्रणा भेदून शत्रूची विमाने भारतातील मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर हल्ला करतील अशी शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती.
म्हणूनच पाकिस्तानची विमाने भारतात शिरल्यास घ्यावयाच्या खबरदारी आणि बॉम्बवर्षाव झाल्यास काय करावे याचे मार्गदर्शन याकाळात दररोज केले जात होते हे मला स्पष्ट आठवते.
यातला आणखी एक खबरदारीचा उपाय म्हणून त्या युद्धाच्या काळात शहरात रोज रात्री ‘ब्लॅकआऊट' असायचा.
शत्रूच्या विमानांना ही शहर लोकवस्ती आहे हे कळू नये म्हणून रात्रीच्या काळात असा अंधार केला जायचा. रस्त्यावरचा, दुकानांतला आणि घरांतला वीजपुरवठा पुर्णतः बंद असायचा.
त्याकाळात देशात आणि महाराष्ट्रात विजेचा फारसा वापर वाढलेला नव्हता.
विद्युतीकरण केवळ काही श्रीमंत लोकांच्या घरांपर्यंत आणि दुकानांत पोहोचले होते.
आमच्या ‘पारखे टेलर्स' दुकानात आणि सोनार लेन मधील इतर बहुतेक दुकानांत तोपर्यंत विजेचे कनेक्शन आले नव्हते, त्यामुळे सूर्यास्ताआधी सगळे दुकानदार आपापल्या पेट्रोमॅक्स बत्त्या साफसूफ करुन त्या पेटवत असत.
आमच्या चाळीत एकाही घरात वीज आलेली नव्हती, त्यामुळे रॉकेलच्या छोट्या मोठ्या बत्त्या, एकदोन कंदिल यावर संपूर्ण घरांत स्वयंपाक व्हायचा, इतर कामे उरकली जायची.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आमच्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरातही खूप कमी होती. या कारणांमुळे एरव्हीसुद्धा या तालुक्याच्या ठिकाणी संध्याकाळनंतर शत्रुपक्षाच्या विमानातून खाली जमीनीवर उजेड दिसून मानववस्तीची कल्पना येईल अशी शक्यता फार कमी होती.
या ब्लॅकआऊट उपायाव्यतिरिक्त लोकांनी बिडीकाडीसाठीसुद्धा काडी पेटीचा वापर करु नये अशी सक्त ताकिदच होती.
फारच तलफ आली तर दोन्ही हातांनी झाकून म्हणजे मूठ बंद करुन विडी शिलगावी, ओढावी असा आदेश होता.
त्या दिवसांत शहरात अनेकदा वर उडणाऱ्या हेलिकॉप्टर आणि विमानांची घरघर कानावर यायची. अशी हेलिकॉप्टर्स आणि विमाने श्रीरामपुरात क्वचितच दिसायची.
शत्रुच्या विमानांचा बॉम्बहल्ला झाल्यास लगेच घराबाहेर पडावे, कुठलीही हालचाल न करता जमिनीवर झोपून राहावे अशा सूचना मिळाल्याचे आठवते.
आजही स्पष्ट आठवते कि पूर्व पाकिस्तानात स्थानिक मुक्ती बाहिनीचे लोक भारतीय फौजेसह डाक्क्याच्या दिशेने आगेकूच करताना तेथील लोक त्यांचे आनंदांने उत्फुर्त स्वागत करत होते अशा बातम्या दररोज वाचायला मिळायच्या. ते वाचून अंगावर रोमांच उभे राहायचे.
पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय फौजेसमोर पांढरे निशाण फडकावून बिनशर्त शरणागती पत्करली, हा या १९७१च्या युद्धाचा परमोच्च बिंदू आणि भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक अत्यंत रोमांचकारी घटना.
भारतीय लष्कराचे प्रतिनिधी जनरल जगजित सिंग अरोरा यांच्या उपस्थितीत पाकिस्तानी अधिकारी लेफ्ट. जनरल अमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी शरणागतीच्या करारावर सह्या केल्या तो एक ऐतिहासिक क्षण
याचबरोबर बांगलादेश हे नवे राष्ट्र जगाच्या भूगोलावर अस्तित्त्वात आले.
पाकिस्तानातून सुटका होऊन शेख मुजिबर रेहमान दिल्लीत आले त्यादिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीबर रेहमान यांचे फोटो त्या दिवशी अनेक दैनिकांत पान एकवर ठळकपणे झळकले होते
भारत आणि पाकिस्तान ही दोन नवी राष्ट्रे जन्माला आली तेव्हा अखंड भारताची बहुसंख्य हिंदू आणि बहुसंख्य मुस्लीम या आधारावर भारत आणि पाकिस्तान अशी धर्माच्या आधारावर फाळणी करण्यात आली होती.
भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्याही एकमेकांपासून दूर अंतरांवर असलेले दोन वेगवेगळे भूखंड केवळ एक समान धर्म या आधारावर एक राष्ट्र म्हणून फार काळ राहू शकत नाही हे पूर्व पाकिस्तान हा प्रदेश पश्चिम पाकिस्तानपासून वेगळॆ झाल्याने सिद्ध झाले.
केवळ धर्म या समान धाग्याच्या आधारावर वेगवेगळया संस्कृतीचे लोक एक राष्ट्र म्हणून एकत्र नादुन शकत नाही हे यातून पुन्हा एकदा दिसून आले.
***लेखक कॅमिल पारखे हे द टाईम्स ऑफ इंडिया, द इंडियन एक्स्प्रेस, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ या वृत्तपत्राचे माजी जेष्ठ पत्रकार आहेत.