मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विखे पाटील फौंडेशनच्या सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण
◻️ वैद्यकीय महाविद्यालयातील सहाशे विद्यार्थीनींसाठी राहाण्याची सुविधा
संगमनेर LIVE (अहील्यानगर) | शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या पद्मश्रीं डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडशनने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीनीसाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
डाॅ. विखे पाटील फौडेशनच्या कॅम्पस मध्ये सुमारे सहाशे विद्यार्थीनीच्या राहाण्याची सुविधा असलेले वसतिगृह फौडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे. या वसतिगृहात सर्व सुविधा आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून या सिंधू वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, आ. शिवाजीराव कर्डीले, डाॅ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे, आ. अमोल खताळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनी विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, फौडेशनचे डाॅ. अभिजीत दिवटे सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी रिमोट द्वारे वसतिगृहाच्या सिंधू नामफलकाचे तसेच कोनशिलेचे अनावरण केले. इमारतीची पाहाणी करून समाधान व्यक्त केले. डॉ .सुजय विखे पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शिक्षण आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यात फौडेशनची भूमिका नेहमीच सामाजिक बांधिलकीची राहीली आहे. ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या परंतू कमी खर्चात आरोग्य सुविधा देण्याचा विचार खासदार साहेबांनी दिला तोच पुढे घेवून जाण्याचे काम आम्ही करीत आहोत.
अवयव प्रत्यारोपणची सुविधा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आहे. उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डॉ. विखे पाटील महाविद्यालयचा गौरव झाला असल्याचा अभिमान असल्याचे विखे पाटील म्हणाले.