तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तात्काळ करा
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या महसूल व कृषि अधिकाऱ्यांना सूचना
◻️ अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना फलदायी ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरतोय
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात गेली चार ते पाच दिवसांपासून मान्सून पूर्व वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे आणि काही ठिकाणी घरांचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करावेत. असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील शेतकरी खरीप पूर्व शेतीची मशागत करण्यात गुंतलेला असताना अचानक चार ते पाच दिवसापासून वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. तर, काही ठिकाणी गारपीट झाली. तसेच काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा भाजीपाला, फळपिके, चारापिके आणि वीटभट्ट्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचबरोबर वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली तर, काही ठिकाणी घरे पडल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.
त्यामुळे हा मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी फलदायी न ठरता नुकसानकारकच ठरला आहे. या सर्व नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांची शेती पिकांचे, घरांचे आणि गोठ्यांचे त्वरित पंचनामे सुरू करावेत. अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.