आश्वीच्या आठवडे बाजारात अवकाळी पावसामुळे बाजारकरुची उडाली धांदल
◻️ आंबा, जांभुळ, डाळींब फळ पिकांचा अवकाळीच्या तडाख्याने पडला सडा
संगमनेर LIVE (आश्वी) | मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे आश्वी बुद्रुक येथील आठवडे बाजारा सह पंचक्रोशीतील गावांना झोडपून काढले. या पाऊस व वाऱ्यामुळे आठवडे बाजारातील शेतकरी, व्यापारी आणि बाजारकरुचे पाल उडुन गेले. तर विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला असलेल्या सुखदेव ताजणे यांचे रसवंतीगृह हे देखील वादळी वाऱ्याने खाली कोसळल्यामुळे त्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले.
सोमवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक सह पंचक्रोशीतील गावांना मान्सूनपुर्ण अवकाळी पावसाने पुन्हा तडाखा ठेवून दिला. यावेळी अर्धातास चाललेल्या जोरदार पावसामुळे आश्वी बुद्रुकचा आठवडे बाजार झोडपून काढला. त्यामुळे काही काळासाठी बाजारकरुची धांदल उडाली होती. अनेक व्यापारी व शेतकऱ्यांचा माल भिजल्याने झालेल्या नुकसानामुळे हताश झाले होते. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सोमवारी सकाळपासूनचं ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हवेत उकाडा वाढला होता. दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धातास जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते.
दरम्यान शेतकऱ्यांच्या आंबा, जांभुळ, डाळिंब या फळ पीकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे झाडाखाली फळांचा सडा पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
दुपारच्या सुमारास आभाळ आल्यानंतर विजाचा गडगडाट सुरु झाल्यामुळे सकाळी तीस रुपयाला विकलेली मेथीची भाजीची जुडी मात्र, वीस रुपयात, पालक पंधरा रुपये, कोथिंबीर दहा रुपये, भेंडी वीस रुपये किलो, टमाटे वीस रुपये तर, गावरान आंबे पन्नास रुपये किलो अशा कमी किंमतीला विकून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी देखील घरी जाण्याला प्राधान्य दिले. अशी माहिती जेष्ठ पत्रकार योगेश रातडीया यांनी कळवली आहे.