हिवरगाव पठार ग्रामपंचायतचे सदस्य रामदास गोंदके यांचा सदस्यपदाचा राजीनामा
◻️ साकुर पठार भागातील खमक्या कॉग्रेस समर्थकांची पक्षाला सोडचिठ्ठी?
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील हिवरगाव पठार ग्रामपंचायतीचे काँग्रेसचे सदस्य रामदास भिमाजी गोंदके यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा सरपंच सुप्रिया मिसाळ यांच्याकडे सादर केला आहे. कॉग्रेस समर्थकाने राजीनामा दिल्यामुळे पठार भागातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
रामदास गोंदके हे आदिवासी बहुल असलेल्या हिवरगाव पठार ग्रामपंचायतच्या गिर्हेवाडी प्रभागातून निवडून आलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आदिवासी बांधवांच्या अडी अडचणी तसेच त्यांच्या प्रश्नांबाबत माजी मंत्री थोरात यांच्याशी चार पाच महिन्यांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रयत्न सुरू होता. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा आरोप गोंदके यांनी केला आहे. "जर आदिवासी समाजाचे प्रश्नच मार्गी लागणार नसतील, तर या पक्षात राहून उपयोग होणार तरी काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान या घटनेमुळे कॉग्रेस नेतृत्व आणि पदाधिकारी यांच्यात सुसंवाद नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाल्यामुळे इतर कॉग्रेस कार्यकर्त्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.