महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रगतीकडे - आमदार अमोल खताळ
◻️ महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
संगमनेर LIVE | महाराष्ट्र ही साध, संतांची आणि महतांची भूमी आहे. त्यांच्या ताकदीमुळेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची देशात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र कधीच थांबणार नाही. तर कायमच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत राहील असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर शहरातील नगरपालिकेच्या क्रीडा संकुलनामध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संगमनेरचे प्रभारी प्रांताधिकारी विशाल यादव, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उप विभागीय कृषि अधिकारी विलास गायकवाड, प्रांत आधिकारी कार्यालय नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, देविदास ढुमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, महाराष्ट्र गीतातून प्रत्येकाच्या अंगावर अक्षरशः शहारे उमटतील एवढी ताकद महाराष्ट्रातील साधुसंतांनी निर्माण केलेली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे चांगले निर्णय घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्र कधी थांबणार नाही तो कायमच प्रगतीच्या दिशेनेच वाटचाल करत राहील आणि महाराष्ट्राचे नाव देशात नव्हे तर जगात कसे उज्वल होईल यासाठी सर्वांनाबरोबर घेऊन जाण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
दरम्यान तहसीलदार धीरज मांजरे यांनी आमदार खताळ यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाल्याबद्दल संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.