उंबरी बाळापूर शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद!
◻️ मागील आठ दिवसांपासून देत होता पिंजरा व वनविभागाला हुलकावणी
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर - आश्वी बु।। शिवेलगत शेतकरी सखाराम आबाजी सारबंदे यांच्या शेतात मागील आठ दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हुलकावणी देणारा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची या बिबट्याच्या दहशतीतून मुक्तता झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून उंबरी बाळापूर येथील प्रगतिशील शेतकरी सखाराम आबाजी सारबंदे यांच्या वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला होता. १० ते १२ दिवसापूर्वी बिबट्याने सारबंदे यांच्या दोन कुत्र्याचा लगतच्या शेतात नेवुन फडशा पाडला होता. या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.
त्यामुळे सारबंदे कुटुंबातील तरुणांनी थेट वनविभागाचे कार्यालय गाठत त्यांना सर्व हकीगत सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आठ दिवसांपूर्वी सारबंदे यांच्या गट क्रमांक १३३ मध्ये वनविभागाने पिंजरा लावत त्यामध्ये भक्ष्य ठेवले होते. मात्र, आठ दिवसांपासून हा बिबट्या पिंजऱ्यात अडकण्याऐवजी हुलकावणी देऊन निघुन जात होता.
शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे त्याची डरकाळी ऐकून सारबंदे कुटुंबाचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ वनविगाला माहिती दिली असता पाहटे लवकर येऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा बिबट्या ताब्यात घेतला असून तो नर जातीचा असल्याची माहिती दिली.
दरम्यान याप्रसंगी महेश सारबंदे, भिमाशंकर सारबंदे, सखाराम सारबंदे, चैतन्य सारबंदे, विवेक डोखे यांच्यासह स्थानिक नागरीक उपस्थित होते. तर, या परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता नागरीकांनी वर्तवली आहे.